आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडविरूद्धची टी- 20 मालिकाही भारताच्या खिशात, चहल सामनावीरसह मालिकावीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- टीम इंडियाने बुधवारी तिसऱ्या अाणि निर्णायक टी-२० सामन्यात इंग्लंडला धूळ चारली. भारताने अापल्या  घरच्या मैदानावर ७५ धावांनी  विजय संपादन केला. यासह भारताने तीन टी-२० सामन्यांची मालिका २-१ ने अापल्या नावे केली.  सामनावीर व मालिकावीर यजुवेंद्र चहलच्या (६/२५) धारदार गाेलंदाजीच्या बळावर  भारताने  राेमहर्षक विजय संपादन केला. 
 
फाॅर्मात असलेल्या सुरेश रैना (६३) अाणि महेंद्रसिंग धाेनी (५६) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना  निर्धारित २० षटकांत ६ बाद २०२ धावा काढल्या. यजुवेंद्र चहल अाणि जसप्रीत बुमराहने प्रत्युत्तरात इंग्लंडचा १६.३ षटकांमध्ये अवघ्या १२७ धावांमध्ये धुव्वा उडवला. इंग्लंडकडून ज्याे रुटने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. मात्र, त्याला टीमचा पराभव टाळता अाला नाही. चहल अाणि बुमराहने भारताला झटपट विजय मिळवून दिला. 

धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडची निराशाजनक सुरुवात झाली. यजुवेंद्र चहलने भारताला चांगली सुरुवात करून दिली. त्याने सलामीवीर बिलिंग्सला अाल्यापावली तंबूत पाठवले. त्यामुळे बिलिंग्सला भाेपळाही न फाेडता तंबूत परतावे लागले. त्यानंतर जेसन राॅय अाणि ज्याे रुटने डाव सावरला. त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी ४७ धावांची भागीदारी केली. 
  
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर अाणि कर्णधार विराट काेहली २ धावा काढून बाद झाला. त्याला जाॅर्डनने धावबाद केेले. त्यामुळे काेहली स्वस्तात बाद झाला. त्याला समाधानकारक खेळी करता अाली नाही.   

त्यानंतर लाेकेश राहुल अाणि सुरेश रैनाने संघाचा डाव सावरला. त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी ६१ धावांची भागीदारी केली. दरम्यान, गत सामन्यात अर्धशतक ठाेकणारा लाेकेश राहुल २२ धावांवर बाद झाला. त्याने १८ चेंडूंमध्ये २ चाैकार अाणि एका षटकाराच्या अाधारे २२ धावा काढल्या. त्यानंतर सुरेश रैनाने धाेनीसाेबत महत्त्वपूर्ण खेळी केली. या दाेघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. दरम्यान, रैनाला प्लंकेटने बाद केले. त्याने ४५ चेंडूंचा सामना करताना २ चाैकार अाणि ५ षटकारांच्या अाधारे ६३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दरम्यान, धाेनीनेही शानदार अर्धशतक ठाेकले. या वेळी १० चेंडूंत ३ षटकार व १ चौकारासह युवराजने २७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

विराट विक्रम
कर्णधार विराट काेहलीने पाहुण्या इंग्लंडविरुद्ध मालिकेत नवा विक्रम केला. त्याने भारतीय संघाला मायदेशात प्रतिस्पर्धी संघाविरुद्धची कसाेटी, वनडे अाणि टी-२० मालिका जिंकून देण्याचा विक्रम केला. असे करणारा ताे पहिला कर्णधार ठरला. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची ५ कसाेटी सामन्यांची, ३ वनडे सामन्यांची अाणि ३ टी-२० सामन्यांची मालिका जिंकली. त्याने कुशल नेतृत्वाच्या बळावर टीम इंडियाला यश मिळवून दिले.त्याने नेतृत्वाशिवाय फलंदाजीमध्येही महत्त्वपूर्ण याेगदान दिले. 

धाेनीचे पहिले अर्धशतक 
महेंद्रसिंग धाेनीला अापल्या टी-२० करिअरमध्ये दहा वर्षांनंतर पहिले अर्धशतक ठाेकले. त्याच्या नावे अातापर्यंत ७५ सामन्यांत ४८ धावांची सर्वाेत्कृष्ट खेळीची नाेंद हाेती. अाता त्याने करिअरमधील ७६ व्या टी-२० सामन्यात ५६ धावांची खेळी केली.

चेस मास्टर चहल चमकला
चेस मास्टर यजुवेंद्र चहलने इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या अाणि शेवटच्या टी-२० मध्ये सर्वाेत्तम कामगिरी केली. त्याने  २५ धावा देत ६ विकेट घेतल्या. त्याची ही सर्वाेत्कृष्ट कामगिरी ठरली. त्याने  सहाव्या सामन्यात हे यश मिळवले. त्याने १८ जून २०१६ राेजी झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यातून  टी-२० करिअरला सुरुवात केली. 

इंग्लंडविरुद्ध पहिला मालिका विजय
भारतीय संघाने टी-२० या छाेट्या फाॅर्मेटमध्ये पहिल्यांदा इंग्लंडविरुद्ध मालिका विजय संपादन केला. अातापर्यंत या दाेन्ही संघांमध्ये टी-२० च्या पाच मालिका झाल्या. अाता काेहलीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा मालिका विजयाचे यश संपादन केले.

भारताची मालिका विजयाची हॅट््ट्रिक!  
काेहलीच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडविरुद्ध मालिका विजयाच्या हॅट््ट्रिकची नाेंद केली. भारताने पाच कसाेटी सामन्यांची मालिका अाणि तीन वनडेपाठाेपाठ अाता तीन टी-२० सामन्यांची मालिका जिंकली.  भारताने ४-० ने कसाेटी, २-१ ने वनडे  अाणि अाता २-१ ने टी-२० मालिका जिंकली.

माेर्गन-रुटची अर्धशतकी भागीदारी 
इंग्लंडकडून माेर्गनने  ज्याे रुटसाेबत तिसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. रुटने ३७ चेंडूंमध्ये ४ चाैकार अाणि २ षटकारांच्या अाधारे ४२ धावा काढल्या. माेर्गनने २१ चेंंडूंमध्ये ४० धावा काढल्या.

असाही पराक्रम
- ०३ टी-२० सामन्यांची सलग तिसरी मालिका भारताने जिंकली. असे करणारा  भारत हा जगातील पहिला संघ. अाॅस्ट्रेलियाने असे यश दाेन वेळा मिळवले. 
- ०६ वेळा टी-२० मध्ये २०० वा त्यापेक्षा अधिक धावसंख्या भारतीय संघाने रचली.

साेनेरी यश
०६ विकेट यजुवंेंद्र चहलच्या
२-१ ने भारताने जिंकली मालिका
७५ धावांनी इंग्लंडचा पराभव
१२७ धावांत इंग्लंडचा खुर्दा
बातम्या आणखी आहेत...