आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Cricket Team Come On Victory Track Ajinkay Rahane

झिम्बाब्वे दौरा: विजयपथावर आणण्याचा रहाणेचा विश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकार परिषदेत बोलताना कर्णधार अजिंक्य रहाणे. छाया : संदीप महाकाळ. - Divya Marathi
पत्रकार परिषदेत बोलताना कर्णधार अजिंक्य रहाणे. छाया : संदीप महाकाळ.
मुंबई - भारतीय संघाचे अचानक चालून आलेले नेतृत्व हा एक आश्चर्याचा सुखद धक्का होता. हे नेतृत्व म्हणजे एक आव्हान आहे. मला आव्हान स्वीकारायला नेहमीच आवडते. मात्र, भारतीय संघासाठी हे आव्हान मी यशस्वीपणे पूर्ण करीन तसेच टीम इंडियाला विजयीपथावर आणीन, असा विश्वास अजिंक्य रहाणे याने झिम्बाब्वे दौ-यावर रवाना होण्याआधी व्यक्त केला.

अजिंक्य रहाणे पुढे म्हणाला, ‘झिम्बाब्वेला मी याआधी गेलो आहे. त्यामुळे तेथील वातावरणाचा अंदाज मला आहे. मात्र, तेथे जाऊनच आम्ही रणनीती ठरवणार आहोत. बांगलादेशविरुद्धची कामगिरी हा गत इतिहास आहे. तो विसरून आम्ही संघाला या दौ-यात पुन्हा विजयपथावर आणू हा विश्वास आहे, असेही मत रहाणेने व्यक्त केले. मी मुंबई, राजस्थान व भारतासाठी सलामीला खेळलो आहे. मात्र, झिम्बाब्वे दौ-यात सलामीला खेळायचे की खाली, हे तेथे परिस्थितीनुरूप ठरवणार आहोत.'

महेंद्रसिंग धोनीची स्तुती
या वेळी अजिंक्य रहाणेने नियमित कर्णधार धोनीची स्तुती केली. तो म्हणाला, ‘धोनीकडून कसे शांत राहून संयमी नेतृत्व करायचे हे शिकलो. द्रविडकडून सरळ साधी रणनीती शिकलो. स्मिथकडून परिस्थितीनुरूप निर्णय घेऊन नेतृत्व करण्याचा अनुभव घेतला.'

सर्व खेळाडू महत्त्वाचे
दौ-यावर येणारा प्रत्येक खेळाडू महत्त्वाचा आहे. एक खेळाडू नेहमीच चांगला खेळ करून जिंकून देऊ शकत नाही. मात्र, प्रत्येक खेळाडूचा सतत हातभार लागल्याने संघ जिंकत असतो. त्यामुळे संघात एकी महत्त्वाची आहे, असे मत रहाणेने व्यक्त केले.

आमचा संघ समतोल
बांगलादेश दौ-यात वगळण्यात आल्याचे मला काहीच वाटले नाही. कारण मी प्रत्येक गोष्ट खिलाडूवृत्तीने स्वीकारत असतो. या दौ-यात उत्तम कामगिरी करणारे नवोदित खेळाडू भारताच्या मुख्य संघात प्रवेश मिळवू शकतात. त्यांच्यासाठी हीच गोष्ट प्रेरणादायी आहे. संघाची तयारी पूर्ण झाली असून संघ समतोल आहे. झिम्बाब्वे संघ सध्या फॉर्मात असून तो घरच्या मैदानावर खेळत आहे, हे मोठे आव्हान असल्याचे अजिंक्य रहाणेने सांगितले.