नवी दिल्ली - जहीर खानच्या नेतृत्वाखाली यजमान दिल्ली डेअरडेव्हिल्सला नवव्या सत्राच्या अायपीएलमध्ये शुक्रवारी विजयाचा सूर गवसला. यजमान टीमने स्पर्धेतील अापल्या दुसऱ्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला. दिल्ली संघाने ८ गड्यांनी शानदार विजयाची नाेंद केली.सामनावीर अमित मिश्राच्या (४/११) धारदार गाेलंदाजीपाठाेपाठ डिकाॅकच्या (नाबाद ५९) झंझावाती फलंदाजीच्या बळावर दिल्लीने अापल्या घरच्या मैदानावर १३.३ षटकांत सामना जिंकला. डेव्हिड मिलरच्या पंजाब किंग्जला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ९ गड्यांच्या माेबदल्यात १११ धावा काढल्या हाेत्या.
प्रत्युत्तरात दिल्ली टीमने दाेन गडी गमावून ११३ धावा काढल्या. संजू सॅमसन (३३) अाणि पवन नेगी (नाबाद ८) यांनीही संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीचा श्रेयस अय्यर (३) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर डिकाॅक व सॅमसनने दुसऱ्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी केली. डिकाॅकने ४२ चेंंडूंमध्ये ९ चाैकार व एका षटकारासह नाबाद ५९ धावा काढल्या.
नाणेफेक जिंकून कर्णधार जहीर खानने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जहीरचा हा निर्णय अमित मिश्राने सार्थकी लावला. त्याने धारदार गाेलंदाजी करून शानदार चार विकेट घेतल्या. त्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबचा दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. यातूनच मिलरच्या नेतृत्वात पंजाबची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर मुरली विजय (१) झटपट बाद झाला. त्यानंतर मार्श (१३), कर्णधार मिलर (९), मॅक्सवेल (०), मनन वाेहरा (३२) तंबूत परतले. वाेहराने २४ चेंडूंचा सामना करताना पाच चाैकारांसह ३२ धावा काढल्या.
अमित मिश्राचा चाैकार
अमित मिश्राने तीन षटकांत ११ धावा देत शानदार चार बळी मिळवले. मिश्राने शाॅन मार्शसह कर्णधार मिलर, ग्लेन मॅक्सवेल अाणि वाेहराला बाद केले. त्यामुळे पंजाबचा माेठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. जहीर, माेरिस, जयंत यादवने प्रत्येकी एक गडी बाद केला.
पुढे पाहा , आज कोणते होणारे सामने