आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल: गुजरात लायन्सची 'डरकाळी'; किंग्ज इलेव्हनवर सहज मात!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली - वेगवान गोलंदाज ड्वेन ब्राव्होच्या (२२ धावांत ४ विकेट) घातक गोलंदाजीनंतर सलामीवीर अॅरोन फिंचच्या (७४) अर्धशतकाच्या बळावर गुजरात लायन्सने आयपीएलमधील आपल्या पहिल्या लढतीत विजय मिळवला. गुजरातने किंग्ज इलेव्हन पंजाबला ५ विकेटने हरवले. किंग्ज इलेव्हन पंजाबने ६ बाद १६१ धावा काढल्या. गुजरातने १७.४ षटकांत १६२ धावा काढून सहज विजय मिळवला. मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर सनरायझर्स हैदराबादचे आव्हान असेल.

गुजरात लायन्सकडून अॅराेन फिंचने ४७ चेंडूंत १२ चौकारांसह ७४ धावा ठोकल्या. कर्णधार सुरेश रैनाने ९ चेंडूंत २० धावा, तर दिनेश कार्तिकने २६ चेंडूंत नाबाद ४१ धावा काढल्या. दिनेश कार्तिकने ७ चौकार मारले.

तत्पूवी, सलामीवीर मुरली विजय (४२) आणि मनन वोहरा (३८) यांची आक्रमक फलंदाजी आणि ७८ धावांच्या सलामीच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबने गुजरात लायन्सला १६२ धावांचे लक्ष्य दिले. विजयने ३४ चेंडूंत ४२ तर मननने २३ चेंडूंत ३८ धावांची खेळी केली. किंग्ज इलेव्हनने वेगवान सुरुवात करताना ५.४ षटकांत ५० धावा काढल्या. दमदार सुरुवात झाल्याने पंजाबची टीम २०० धावांचा टप्पा गाठेल, असे वाटत होते. ब्राव्होने १२ व्या षटकात २ आणि अखेरच्या षटकात २ गडी बाद करून चार विकेट आपल्या नावे करत पंजाबला रोखले. मिलर (१५), वृद्धिमान साहा (२०) आणि मार्कस स्टोनिस(३३) यांनी पंजाबला ४ बाद १०२ धावा अशा संकटातून सावरले.

ब्राव्होच्या ३०० विकेट
या सामन्यात ४ विकेट घेत ब्राव्होने टी-२० क्रिकेटमध्ये ३०० बळी घेण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने ४ षटकांत २२ धावांत ४ विकेट घेतल्या. डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने ३० धावांत २ गडी बाद केले. ब्राव्होला अखेरच्या षटकातील तिसरी आणि आपली पाचवी विकेट मिळाली असती. मात्र, अक्षर पटेलचा झेल सरबजित लढ्ढाने सोडला.
छायाचित्र: अर्धशतकादरम्यान चौकार खेचताना गुजरात लायन्सचा अॅरोन फिंच.