आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल: केकेआरची सनरायझर्स हैदराबादवर ८ विकेटने मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - कर्णधार गौतम गंभीर (नाबाद ९०) च्या दमदार फलंदाजीच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल-९ मध्ये शनिवारी सनरायझर्स हैदराबादला ८ विकेटने हरवले. गंभीरला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार मिळाला. हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १४२ धावा काढल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने १८.२ षटकांत २ बाद १४६ धावा काढून विजय मिळवला. कोलकाता नाइट रायडर्सचा हा सलग दुसरा विजय ठरला, तर सलग दुसरा पराभव.

धावांचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात जबरदस्त झाली. गंभीर-उथप्पा या दोन्ही सलामीवीरांनी १२.३ षटकांत ९२ धावांची सलामी दिली. या दमदार सलामीने विजयाचा पाया रचला. उथप्पाने ३४ चेंडूंचा सामना करताना १ षटकार, ३ चौकारांसह ३८ धावा काढल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेला आंद्रे रसेल २ धावा काढून मुस्ताफिजूर रहेमानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. यानंतर गंभीरने तिसऱ्या विकेटसाठी मनीष पांडेसोबत नाबाद ४९ धावांची भागीदारी करून विजयावर शिक्कामोर्तब केले. मनीष पांडेने ११ चेंडूंत ११ धावा काढल्या. हैदराबादकडून मुस्ताफिजूर आणि आशिष रेड्डी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
हैदराबादने इयान मोर्गनच्या अर्धशतकाच्या बळावर १४२ धावांचा सन्मानजनक स्कोअर उभा केला. हैदराबादच्या फलंदाजांनी पुन्हा हाराकिरी केली. सलामीवीर आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर १३, शिखर धवन ६, मोईस हेनरिक्स ६, दीपक हुड्डा ६ यांनी खेळपट्टीवर केवळ हजेरी लावण्याचे काम केले. हैदराबादची टीम ४ बाद ५० धावा अशी अडचणीत सापडली होती. यानंतर इयान मोर्गन आणि नमन ओझा यांनी पाचव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. नमन ओझाने २८ चेंडूंत २ षटकार, २ चौकारांसह ३७ धावा काढल्या. मोर्गनने ४३ चेंडूंत २ षटकार, ३ चौकारांसह ५१ धावा काढल्या.
उमेशच्या ३ विकेट
कोलकाता नाइट रायडर्सकडून वेगवान गोलंदाज उमेश यादवने २८ धावांत ३ गडी बाद केले. मोर्न मोर्कलने ३५ धावांत दोघांना टिपले. रसेलने एक विकेट घेतली. उमेशने १०, मोर्कलने ११, रसेलने १२, नरेनने १० चेंडू निर्धाव टाकले.

आजचे सामने
पुणेसमोर किंग्ज पंजाब
मोहाली | इंडियन प्रीमियर लीगमध्ये रविवारी महेंद्रसिंग धोनीच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्ससमोर किंग्ज इलेव्हन पंजाबचे आव्हान असेल. स्पर्धेत दोन्ही संघांचे आतापर्यंत प्रत्येकी दोन सामने झाले आहेत. रायझिंग पुणेने एक सामना जिंकला, तर एक गमावला. दुसरीकडे पंजाबने दोन्ही सामने गमावले आहेत. रविवारच्या सामन्यात विजय मिळवून दोन्ही संघ गुणतालिकेत आगेकूच करण्याच्या प्रयत्नात असतील.

दिल्लीपुढे आज बंगळुरू
बंगळुरू | किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध विजय मिळवल्यानंतर ट्रॅकवर परतलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सपुढे रविवारी होणाऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान असेल. दिल्लीच्या तुलनेत कागदावर तरी बंगळुरूची टीम मजबूत दिसत आहे. मात्र, टी-२० खेळामध्ये त्या दिवशी जी टीम चांगले प्रदर्शन करते तीच जिंकते. मागच्या सामन्यात जहीरने शानदार गाेलंदाजी केली होती.
बातम्या आणखी आहेत...