कोलकाता - कर्णधार रोहित शर्मा (नाबाद ८४) आणि जोस बटलरच्या (४१) शानदार फलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने आयपीएल सामन्यात बुधवारी कोलकाता नाइट रायडर्सवर ६ विकेटने विजय मिळवला. केकेआरने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १८७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात मुंबईने हे लक्ष्य १९.१ षटकांत १८८ धावा काढून गाठले.
मुंबईकडून पार्थिव पटेलने २० चेंडूंत चौकारांसह २३ धावा काढल्या. मॅक्लानघनने ८ चेंडूंत ३ षटकारांसह २० धावांचे योगदान दिले. रोहित शर्माने ५४ चेंडूंचा सामना करताना २ षटकार, १० चौकारांसह नाबाद ८४ धावा काढल्या. सलामीला आलेला रोहित अखेरपर्यंत नाबाद राहिला. जोस बटलरने २२ चेंडूंत ३ षटकार, ३ चौकारांसह ४१ धावा झोडपत विजय खेचून अाणला.
तत्पूर्वी, कर्णधार गौतम गंभीर (६४) आणि मनीष पांडेच्या (५२) अर्धशतकाच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने ५ बाद १८७ धावा काढल्या. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर रॉबिन उथप्पा ८ धावा काढून बाद झाला. त्याला मॅक्लानघनने पोलार्डकरवी झेलबाद केले. केकेआरच्या ३.४ षटकांत २१ धावा झाल्या असताना उथप्पा बाद झाला. यानंतर गंभीर आणि मनीष पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. केकेआरच्या १२१ धावा झाल्यानंतर मनीष पांडे बाद झाला. मनीष पांडेने २९ चेंडंूत ३ षटकार, ३ चौकारांसह ५२ धावा ठोकल्या. आंद्रे रसेलने १७ चेंडूंत ३६ धावांची वेगवान खेळी करून केकेआरला १५० च्या पुढे पोहोचवले. रसेलने १७ चेंडूंत ४ उत्तंुग षटकार आणि १ चौकार मारत ३६ धावा कुटल्या. गंभीरने ५२ चेंडूंत १ षटकार, ४ चौकार मारत ६४ धावा काढल्या. कॉलिन मुनरो ४ धावांवर नाबाद राहिला.
पुढे वाचा... रोहित ठरला 'हिट', गंभीरचे ४० वे अर्धशतक , आज धोनी-रैना समोरासमोर!