आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर जडेजाचे पुनरागमन, आफ्रिकेविरुद्ध दोन कसोट्यांसाठी भारतीय संघ जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या यजमान भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील आगामी दोन वनडेसाठी टीममध्ये काहीसा बदल केला आहे. तसेच कसोटी मालिकेसाठी नुकताच भारतीय संघ जाहीर करण्यात आला. या वेळी निवड समितीने रणजी ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या रवींद्र जडेजाला कसोटी संघात स्थान दिले आहे. त्यामुळे त्याला पुनरागमन करण्याची सुवर्णसंधी मिळाली. त्यापाठोपाठ युवा खेळाडू अरविंदला वनडे संघात सहभागी करण्यात आले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वात सोमवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या वेळी निवड समितीने आफ्रिकेविरुद्ध चौथ्या, पाचव्या वनडेसाठी आणि मालिकेतील पहिल्या दोन कसोट्यांसाठी संघ जाहीर केला.
‘फिरकीपटू रवींद्र जडेजाची आफ्रिकेविरुद्ध सुरुवातीच्या दोन कसोट्यांसाठी भारतीय संघामध्ये निवड करण्यात आली. त्याने रणजी चषकात चमकदार कामगिरी केली. त्यामुळे त्याला कसोटीसाठी संघात स्थान देण्यात आले, अशी प्रतिक्रिया निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली.

भारताने कानपूर येथे पहिला वनडे गमावल्यानंतर इंदूरमध्ये दमदार पुनरागमन करून दुसरा सामना जिंकला. मात्र, रविवारी राजकोट येथील तिसऱ्या वनडेत यजमान भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीय संघ पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-२ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे आता मालिकेतील आगामी दोन्ही सामने भारतासाठी महत्वाचे आहेत.

जडेजाचे २४ बळी
जडेजाने रणजी चषकातील दोन सामन्यांत ८.२५ च्या सरासरीने २४ विकेट घेतल्या. त्याने सौराष्ट्रचे प्रतिनिधित्व करताना दोन डावांत ९१ आणि ५८ धावांची खेळी केली. जडेजा हा रणजी ट्रॉफीच्या तीन फेऱ्यानंतर सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्यामुळे त्याच्याकडून समितीला उल्लेखनीय कामगिरीची आशा आहे.

असे होतील सामने
२२ ऑक्टोबर चौथा वनडे चेन्नई
२५ ऑक्टोबर पाचवा वनडे मुंबई
५ ते ९ नोव्हेंबर पहिली कसोटी मोहाली
१८ ते २२ नोव्हेंबर दुसरी कसोटी बंगळुरू

*ईशांत मोहाली कसोटीला मुकणार ईशांतला बंदीच्या कारवाईमुळे पहिल्या कसोटीला मुकावे लागेल.

भारताचे दोन्ही संघ असे
वनडे संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अक्षर पटेल, हरभजनसिंग, भुवनेश्वरकुमार, अमित मिश्रा, मोहित शर्मा, श्रीनाथ अरविंद, स्टुअर्ट बिन्नी, अंबाती रायडू, गुरकिरतसिंग.

कसोटी टीम : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वरकुमार, उमेश यादव, लोकेश राहुल, स्टुअर्ट, वरुण अॅरोन, ईशांत शर्मा.

पाक पंच अलीम दार यांना माघारी बोलावले
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या वनडे मालिकेत पाकिस्तानचे अलीम दार हे सामन्यावरील पंच म्हणून भूमिका बजावत आहे. मात्र, सोमवारी शिवसेनेने केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने अलीम दार यांना तातडीने माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला. यासाठीची माहिती आयसीसीने बीसीसीआयला दिली.

हरभजनसिंग, उमेश यादवला बाहेरचा रस्ता
फिरकीपटू हरभजनसिंगच्या मागे लागलेली साडेसाती अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. त्याला कसोटी टीममध्ये स्थान मिळवता आले नाही. निवड समितीने त्याला आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोट्यांसाठी विश्रांती दिली आहे. तसेच उमेश यादवलाही आपले वनडे टीममधील स्थान कायम ठेवता आले नाही. त्याला चौथ्या आणि पाचव्या वनडेसाठी संघाबाहेर ठेवण्यात आले.