आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहली टॉप-१० बाहेर; स्मिथ नंबर वन; मुरली विजय, शिखर धवनची प्रगती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- कसोटी स्टार शिखर धवन, मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे यांनी आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत प्रगती केली आहे. बांगलादेशविरुद्ध कसोटीत चांगली कामगिरी केल्याचे फळ या तिघांना मिळाले. क्रमवारीच्या टॉप-१० मध्ये सामील असलेला टीम इंडियाचा एकमेव खेळाडू आणि कसोटी कर्णधार विराट कोहलीची एका स्थानाने घसरण झाली असून तो अव्वल दहा खेळाडूंतून बाहेर पडला आहे.

ऑस्ट्रेलिया युवा खेळाडू स्टीव्हन स्मिथने क्रमवारीत नंबर वनचे सिंहासन पटकावले आहे. गोलंदाजांच्या यादीत द. आफ्रिकेचा डेल स्टेन नंबर वनच्या खुर्चीवर कायम आहे.
मुरली विजयला तीन स्थानांचा फायदा झाला. तो आता २० व्या क्रमांकावर पोहोचला आहे. बांगलादेशविरुद्ध १७३ धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनने मात्र १५ स्थानांची झेप घेत ४५ वे स्थान मिळवले. आयसीसीने एका प्रसिद्धिपत्रकात म्हटले की, फातुल्ला कसोटीत थोडक्याने शतक हुकलेल्या अजिंक्य रहाणेच्या फलंदाजी रँकिंगमध्ये चार गुणांचा फायदा झाला असून तो कारकीर्दीतील सर्वश्रेष्ठ २२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

टॉप-१० मध्ये स्मिथनंतर श्रीलंकेचा संगकारा दुसऱ्या, द. आफ्रिकेचा ए. बी. डिव्हिलर्स तिसऱ्या, आफ्रिकेचाच हाशिम आमला चौथ्या, लंकेचा मॅथ्यूज पाचव्या, पाकचा युनूस खान सहाव्या, इंग्लंडचा ज्यो रुट सातव्या, न्यूझीलंडचा केन विल्यमसन आठव्या, पाकचा मिसबाह उल हक नवव्या, तर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर दहाव्या क्रमांकावर आहे. कोहली अकराव्या स्थानी आहे. भारताचा चेतेश्वर पुजारा २६ व्या क्रमांकावर आहे.

गोलंदाजीत अश्विनची प्रगती
गोलंदाजांच्या क्रमवारीत आर. अश्विन आणि बांगलादेशचा सकिब अल हसन यांचा प्रत्येकी एका स्थानाने फायदा झाला. दोघे अनुक्रमे १२ व्या आणि १६ व्या क्रमांकावर आहेत. इशांत शर्मा १९ व्या, जहीर खान २४ व्या, रवींद्र जडेजा २९ व्या क्रमांकावर आहे. मो. शमी ३२ व्या तर उमेश यादव ४६ व्या स्थानी आहेत. टॉप टेनमध्ये स्टेननंतर इंग्लंडचा जेम्स अँडरसन दुसरा, न्यूझीलंडचा टीम बोल्ट तिसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचा रेयान हॅरिस चौथ्या क्रमांकावर आहेत. लंकेचा रंगना हेराथ पाचव्या स्थानी आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, स्मिथने संगकाराला मागे टाकले
बातम्या आणखी आहेत...