मुंबई- लोढा समितीच्या शिफारशींमुळे गेली कित्येक वर्षे बीसीसीआय किंवा त्यांच्या राज्य व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या खुर्चीला चिकटून बसलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी लोढा समितीच्या १५९ पानांच्या शिफारशींचा अहवाल सर्व संलग्न संस्था, संघटना यांना अभ्यासासाठी पाठवला आहे.
या संघटनांनी आपापल्या अहवालाच्या अनेक प्रती तयार करून सर्व सदस्यांना पाठवून त्यावर अभ्यास करून आपली बाजू मांडण्यास सुचवले आहे. लोढा समितीच्या शिफारशींवर तमाम क्रिकेट विश्वातून प्रतिक्रिया उमटत असताना बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी व सदस्य मौन पाळून बसले आहेत.
क्रिकेट संघटनांनी या अहवालावर प्रतिक्रिया देण्यासाठी अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ व सार्वजनिक क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत मागितली आहे.
प्रतिष्ठेसाठी क्रिकेट संस्थांचा विराेधया शिफारशींना कडाडून विरोध करण्याचा मानस बहुतांशी क्रिकेट संस्थांचा आहे. राजकारणी व्यक्तींच्याच आश्रयाने उभ्या राहिलेल्या आणि वाढलेल्या या संघटना सहजासहजी हार मानतील, अशी चिन्हे दिसत नाहीत. कारण प्रत्येक प्रमुख पदाधिकारी, वयाच्या किंवा पात्रतेच्या निकषावर बाद होत आहे.