आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांती घडवण्याकरिता उत्सुक, पवारांना आव्हान नसल्याचे पाटील यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राजकारणातील अर्क आणि क्रीडा क्षेत्रातील एक धुरंदर अशी ख्याती असलेल्या शरद पवार यांच्याविरुद्ध कालपरवाच क्रीडा क्षेत्रात आलेल्या विजय पाटील यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या द्वैवार्षिक निवडणुकीत अर्ज भरत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पवारांना आव्हान देणारे कोण हे विजय पाटील? असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे.
विजय पाटील गेली ४ वर्षे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. ते स्वत: क्रिकेटप्रेमी आणि क्रीडाप्रेमी आहेत. मी क्रीडाप्रेमी आहे, असे म्हणत ते आतापर्यंत खुर्च्या उबवित आले नाहीत, तर त्यांनी स्वत: कोट्यवधी रुपयांचे डी.वाय. पाटील स्टेडियम उभे केले. फुटबॉलसाठी व्यासपीठ निर्माण केले. मुंबई क्रिकेटमध्ये कुणी मोठे होऊ देत नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वत: सत्ताबदलाचे शिवधनुष्य उचलले आहे. ‘दिव्य मराठी’शी विजय पाटील यांनी केलेली बातचीत.

क्रीडा क्षेत्रात मला काम करण्याची संधी हवी आहे...
मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उभे राहावे असे मला वाटते. मी वैयक्तिकदृष्ट्या कुणालाही आव्हान दिलेले नाही. शरद पवार यांना नाहीच नाही! पवारांनी देशाच्या क्रीडा क्षेत्रासाठी आणि क्रिकेटसाठी पुष्कळ केले आहे. मात्र तरुणांनाही क्रीडा क्षेत्रात काम करण्याची संधी मिळायला हवी. त्यासाठी मी निवडणुकीत उभा आहे.
अधिकाराचे बळ हवे आहे.

गत निवडणुकीत मी सर्वाधिक मतांनी उपाध्यक्षपदावर निवडून आलो. घटनेनुसार अध्यक्षांच्या गैरहजेरीत मी नेतृत्व करायला हवे होते. माझा तो हक्क नाकारण्यात आला. तेव्हा ‘एमसीए’च्या घटनेनुसार कार्य व्हावे याचा पाठपुरावा करण्यासाठी मी उभा आहे. एके काळी मुंबईतील क्रिकेटपटू चांगल्या नोकऱ्यांमुळे सुस्थितीत होते. आता औद्योगिक संस्थांसाठी चांगली स्पर्धाच होत नाही. त्यामुळे कुणी खेळाडूंना नोकऱ्याही देत नाही. ते चित्र बदलण्यासाठी माझी मुंबई लीग ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यासाठी मला अधिकाराचे, हक्काचे बळ हवे आहे.

हाय परफॉर्मन्स ट्रेनिंग सेंटर
एमसीएकडे सध्या प्रशिक्षणासाठी यंत्रणाच नाही. त्यासाठी हाय परफॉर्मन्स ट्रेनिंग सेंटरची योजना असून मुंबईच्या वसई-विरार तसेच अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली अशा दूरवरच्या उपनगरांत पसरावे ही माझी कल्पना आहे. त्यासाठी वांद्रे येथील क्रीडा संकुलाचा वापर कसा करावा हे मला ज्ञात आहे. माजी कसोटीपटूंचे मार्गदर्शन घेऊन ते सॅटेलाइटद्वारे उपनगरांतील केंद्रांवरही दाखवण्याची माझी योजना आहे.

मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही
आशिष शेलार यांनी भाजपचे जोडीदार शिवसेना, काँग्रेससोबत या निवडणुकीत गेल्याचे म्हटले होते, त्यावर विजय पाटील म्हणतात, ‘मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्यदेखील नाही. मी एक सच्चा क्रीडाप्रेमी. खेळाची अतिशय आवड असलेला उत्साही तरुण म्हणून या निवडणुकीत उतरलो आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मला या मोहिमेत मदत करण्याची तयारी दर्शवली. माझ्यासोबत फक्त राजकारणी नाहीत, तर माजी कसोटीपटू आहेत, क्रीडा संघटक, कार्यकर्तेही आहेत. त्या सर्वांना सोबत घेऊन मुंबईच्या क्रिकेटचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त करून देण्याच्या निर्धाराने मी निवडणूक लढवत आहे. पवार यांच्याविषयी आदर असून ते आयसीसी अध्यक्षपदापर्यंत पोहोचले. आता त्यांना सिद्ध करण्यासारखे काहीही शिल्लक राहिले नाही.