आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे मालिका :मालिका विजयाचे टीम इंडियाचे लक्ष्य! भारत-झिम्बाब्वे दुसरा वनडे आज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरारे - पहिल्या वनडेत कमी अंतराने विजय मिळाल्यानंतर आता रविवारी टीम इंडियाला यजमान झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन हात करायचे आहेत. ही लढत जिंकून मालिका विजयाच्या इराद्याने भारतीय संघ मैदानावर उतरेल. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या १-० ने पुढे आहे. ही आघाडी २-० करण्याचे भारताचे लक्ष्य असेल. दुसरीकडे यजमान झिम्बाब्वे रविवारचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्यासाठी खेळेल.

पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांना एकेका धावेसाठी आणि गोलंदाजांना एकेका विकेटसाठी घाम गाळण्यास भाग पाडून हा मार्ग सोपा नसल्याचे यजमान झिम्बाब्वेने सिद्ध केले. रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयासाठी फेव्हरेट असली, तरीही झिम्बाब्वेला कमी लेखता येणार नाही. पहिल्या वनडेत अंबाती रायडू आणि स्टुअर्ट बिन्नीच्या फलंदाजीमुळे भारतीय संघ संकटातून बाहेर पडला, अन्यथा पहिल्या लढतीतच धक्कादायक निकाल लागला असता. रायडू व बिन्नीमुळे भारताने कसाबसा २५०चा टप्पा ओलांडला होता. रायडूने १२१, तर बिन्नीने ७७ धावा काढल्या होत्या.

झिम्बाब्वेचा संघही मजबूत
सलामीला झिम्बाब्वेने फलंदाजी व गोलंदाजी या दाेन्हींत चांगली कामगिरी केली. त्यांना कमी लेखता येणार नाही. एल्टन चिगुम्बुरा, चिभाभा, हॅमिल्टन मसकदजा हे एकहाती सामना फिरवू शकतात. चिगुम्बुराने मागच्या सामन्यात शतक ठोकले होते. त्याचे प्रयत्न थोड्याने कमी पडले.
हरभजनकडून आशा : प्रदीर्घ कालावधीनंतर ऑफस्पिनर हरभजनसिंगने वनडे संघात पुनरागमन केले. पहिल्या सामन्यात त्याने १० षटकांत ४६ धावांत १ विकेट घेतली.

फलंदाजीची चिंता
>पहिल्या वनडेत रायडू, बिन्नी वगळता इतर फलंदाजांनी नांग्या टाकल्या.
>मुरली विजय (१), मनोज तिवारी (२), रॉबिन उथप्पा (०), केदार जाधव (५) हे फलंदाज अपयशी ठरले. कर्णधार रहाणेने ३४ धावा काढून चांगली सुरुवात केली. मात्र, तो मोठी खेळी करू शकला नाही.
>या फलंदाजांना दुसऱ्या वनडेत मोठी खेळी करून टीम इंडियाला संकटातून बाहेर काढावे लागेल. फलंदाजांचे अपयश टीम इंडियाला संकटात आणू शकते.

दोन्ही संघ असे
भारत : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मुरली विजय, मनोज तिवारी, रॉबिन उथप्पा, केदार जाधव, स्टुअर्ट बिन्नी, अंबाती रायडू, हरभनजसिंग, अक्षर पटेल, धवल कुलकर्णी, भुवनेश्वर, मनीष पांडे, संदीप शर्मा, मोहित शर्मा.
झिम्बाब्वे : एल्टन चिगुम्बुरा (कर्णधार), रेगिस चक्वाब्वा, चामू चिभाभा, ग्रिमी क्रिमर, नेविली मॅडझिवा, हॅमिल्टन मसकदजा, आर. मुतुम्बामी, सिकंदर राजा, प्रन्यांगरा, तिरिपानो, प्रॉस्पर उत्सया, व्हिटोरी, वॉलर, सीन विल्यम्स.