आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघासाठी खेळतो, वैयक्तिक फॉर्मची चिंता नाही : कोहली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'आपण भारतीय संघासाठी खेळताना नेहमीच जबाबदारीने खेळतो. त्यामुळे मला फलंदाजीच्या फॉर्मबाबत कधीही चिंता वाटत नाही,' असे उद्गार भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने चेन्नई येथे काढले. तीन कसोटी सामन्यांच्या श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे चेन्नई येथून प्रयाण होणार आहे. प्रयाणाआधी पत्रकारांशी वार्तालाप करताना कोहली म्हणाला, "फलंदाज म्हणून संघासाठी खेळताना जबाबदारीची जाणीव मला कायम असते. त्यामुळे त्या आघाडीवर माझ्यात बदल करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. त्या गुणामुळेच बोर्डाने माझ्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवली असावी. संघाची जबाबदारी शिरावर घेण्याची माझी क्षमता आहे.'

श्रीलंका दौऱ्याबाबत कोहली म्हणाला, ‘कप्तान म्हणून संपूर्ण दौऱ्यावर जाण्याची ही माझी पहिलीच खेप आहे. त्यामुळे माझ्यासाठी ते नवे आव्हान असेल. त्याचप्रमाणे संघात अनेक नवोदित खेळाडू आहेत, ज्यांना आपली कारकीर्द घडवायची आहे. त्यामुळे संपूर्ण संघही जडणघडणीच्या प्रक्रियेतून जात आहे.’

आपल्या संघातील काही ज्येष्ठ खेळाडूंबाबत विराटने गौरवोद््गार काढले. तो म्हणाला, सलामीवीर मुरली विजय भारताच्या कसोटीतील सक्षम फलंदाज आहे. त्याची मानसिक कणखरता वाखाणण्याजोगी आहे. प्रत्येकाच्या कारकीर्दीत चढ-उतार येतात, तसे त्याच्याही आले. एवढेच नाही तर तो एक सक्षम सलामीचा फलंदाज आहे. सेहवाग-गंभीर जोडीनंतर तोच सर्वोत्तम सलामीचा फलंदाज आहे. हरभजन, अश्विन व मिश्रा या फिरकी गोलंदाजांचे योगदान निर्णायक ठरेल, असे तो म्हणाला.

अजिंक्य रहाणेची स्तुती
मला अजिंक्य फलंदाज म्हणूनही आणि क्षेत्ररक्षक म्हणूनही आवडतो. प्रत्येक वेळी संघासाठी १०० टक्के योगदान देणारा असा स्फूर्तिदायी खेळाडू असणे कधीही चांगलेच. तो खेळतो तो प्रत्येक फटका संघासाठी असतो, तो अडवतो तो प्रत्येक चेंडू संघासाठी मदतगार ठरतो. भारताच्या मधल्या फळीला तो स्थैर्य देऊ शकतो. त्यामुळे त्याचे योगदान महत्त्वाचे आहे. अनुभवी ऑफस्पिनर हरभजनसिंगची साथसंगत संघासाठी उपयोगी ठरणारी आहे, असेही कोहली म्हणाला.
बातम्या आणखी आहेत...