आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pranav Dhanawade Of Mumbai Becomes First Batsman To Score 1000 Runs In An Innings

प्रणव धनावडेने 1009 धावा ठोकून मोडला 117 वर्षांचा विक्रम!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अवघ्या पंधरा वर्षांच्या प्रणव धनावडेने मंगळवारी ३२७ चेंडूंत नाबाद १००९ धावा ठोकून क्रिकेटमधील ११७ वर्षांचा इतिहास मोडला. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील ही जगातील सर्वोच्च धावसंख्या आहे. कल्याणच्या के. सी. गांधी स्कूलकडून एचटी भंडारी कप आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेतील दोनदिवसीय सामन्यात आर्य गुरुकुल संघाविरुद्ध त्याने हा भीमपराक्रम केला. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रणवच्या शिक्षण आणि प्रशिक्षणाचा खर्च उचलण्याची घोषणा केली आहे.

पहिल्या दिवसअखेर तो ६५२ धावांवर नाबाद होता. त्याने आर्थर कोलिन्सचा ६२८* धावांचा विक्रम मागे टाकला. कोलिन्सने १८९९ मध्ये इंग्लंडच्या एका क्लब सामन्यात हा विक्रम केला होता. प्रणवने भारतीय क्रिकेटच्या मायनर क्रिकेटमधीलही वैयक्तिक सर्वोच्च धावांचा पृथ्वी शॉचा ५४६ (२०१३-१४) धावांचा विक्रम मोडला. प्रणवच्या १००९ धावांच्या बळावर त्याच्या संघाने १४६४ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला.

२०० आणि ३५० च्या स्कोअरवर प्रणवचा झेल सुटला होता. यानंतर त्याने बॅट बदलली. भंडारी ट्रॉफी ही आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा असून मुंबई क्रिकेट संघटनेकडून याचे आयोजन होते. हॅरिस शिल्डप्रमाणेच याचे सामने होतात.

> १००९* धावा
> ३२७ चेंडू
> १२९ चौकार
> ५९ षटकार
> ३९५ मिनिटे फलंदाजी
>३१२.३८ स्ट्राइक रेट

माही बनण्याचे प्रणवचे स्वप्न
प्रणव प्रशांत धनावडे. वयाच्या व्या वर्षापासूनच त्याला क्रिकेटचे वेड आहे. तेव्हापासूनच तो क्रिकेट खेळतो. महेंद्रसिंग धोनीप्रमाणे क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न बालपणापासून पाहतो आहे. आक्रमक फलंदाजी करणे आवडते. आपल्या खेळीबाबत प्रणव म्हणाला, "मला नेहमीच मोठे फटके खेळण्यास आवडते. मी खेळण्यास सुरुवात केली तेव्हा एखादा विक्रम मोडेन, असे वाटले नव्हते. माझ्या डोक्यात विक्रमाबाबत काहीच नव्हते. मी केवळ माझा नैसर्गिक खेळ करत होतो.'

विश्वविक्रमी कामगिरी अशी
कौतुक : "अभिनंदन प्रणव! तू खूप चांगली कामगिरी केली आहेस. यापुढेही अशीच मेहनत कर. तुला खूप पुढे आणि उंचीवर जायचे आहे.' -सचिन तेंडुलकर.

लेकाची कीर्ती ऐकून वडील मैदानावर :
प्रणवचे वडील प्रशांत कल्याणमध्ये अॉटोरिक्षा चालवतात. प्रणवच्या मित्राने त्यांना त्याच्या कामगिरीची माहिती दिली. यानंतर ते मैदानावर पोहोचले. "माझा विश्वासच बसला नाही. मी लगेचच मैदानावर गेलो आणि मुलाची पूर्ण फलंदाजी बघितली,' असे ते म्हणाले. कोच मोमीन शेख यांच्या मते, प्रणव निडर क्रिकेटपटू असून तो उत्तम यष्टिरक्षकही आहे.