कोलकाता- बीसीसीआयने
टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड याला अंडर-19 आणि इंडिया ए संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. कोलकत्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही व्ही एस लक्ष्मण सहभागी झाले होते.
असा झाला द्रविड कोच
आयपीएल-8 मध्ये राहुल द्रविड राजस्थान रॉयल्स टीमचा कोच होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्य रहाणे, शेन वॅटसन यांच्यासह अनेक खेळाडूंनी उत्कृष्ठ प्रदर्शन केले होते. एवढेच नव्हे तर ऑस्ट्रेलियाच्या टीमचा भविष्यातील संभाव्य कर्णधार स्टिव्हन स्मिथ याने द्रविडचे अनेकवेळा कौतुक केले आहे. त्याने खेळाडूंच्या बेस्ट परफॉर्मंन्सचे श्रेय द्रविडला दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून द्रविडला टीम इंडियाचा प्रशिक्षक करण्यावरही चर्चा सुरु होती. पण बीसीसीआयने त्याला अंडर-19 आणि इंडिया-एचा कोच केले आहे.
गांगुली असेल टीम इंडियाचा कोच?
गेल्या काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली टीम इंडियाचा कोच होणार असल्याची चर्चा होती. आता द्रविडला अंडर-19 आणि इंडिया-एचा कोच केले असल्याने टीम इंडियाची जबाबदारी गांगुलीवर येण्याची शक्यता वाढली आहे. गांगुली आणि द्रविडने सोबत बरीच वर्षे क्रिकेट खेळले आहे. या दोघांमध्ये चांगले समन्वय आहे. याचा विचार कदाचित बीसीसीआय करीत असावी.