आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin,Ganguly, Laxman On BCCI's Adviser Committee

बीसीसीआयच्या सल्लागार समितीमध्ये त्रिदेवचा समावेश ! सचिन, गांगुली, लक्ष्मणची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टीम इंडियाचे त्रिदेव अर्थात सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांचा बीसीसीआयच्या नवगठित सल्लागार समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. खेळाशी संबंधित सर्व मुख्य विषयांवर हे तिघे मंडळाला मार्गदर्शन करतील. टीम इंडियाचा मिस्टर वॉल म्हणजे राहुल द्रविड या समितीमध्ये नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यांसाठी द्रविड वेळ देऊ शकणार नाही.

बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी टि्वट करून सांगितले की, याबाबत खूप दिवसांपासून चर्चा होती. मात्र, मी आज याबाबत अधिकृत घोषणा करीत आहे. ठाकूर यांनी टि्वटरवर लिहिले की, "मी सचिन, सौरव आणि लक्ष्मण यांचे बीसीसीआयमध्ये स्वागत करतो. तुमचे मार्गदर्शन आणि सहकार्य खूप उपयोगी ठरू शकेल. आम्ही एका नव्या इनिंगला सुरुवात करतोय.'

मुख्य कोच किंवा टीम डायरेक्टर म्हणून सौरव गांगुलीची निवड होऊ शकते, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, सल्लागार समितीमध्ये त्याची नियुक्ती झाल्याने आता रवी शास्त्रीच संघाचे डायरेक्टर राहतील किंवा मुख्य कोच आणि इतर स्टाफमध्ये नव्याने नियुक्ती होईल, हे स्पष्ट संकेत आहेत. राहुल द्रविडची काय भुमिका असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हे आहे त्रिमूर्तीचे योगदान
सचिन टॉपवर
सचिनने २०० कसोटींत १५,९२१ धावा, तर ४६३ वनडेत १८,४२६ धावा काढल्या. त्याने नोव्हेंबर २०१३ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

सौरवचा प्रभावी प्रवास
सौरव गांगुलीने ११३ कसोटींत ७२१२ धावा, तर ३११ वनडेत ११,३६३ धावा काढल्या. २००३ च्या वर्ल्डकपमध्ये त्याने भारताला फायनलमध्ये पोहोचवले होते.

संकटमोचक लक्ष्मण
लक्ष्मणने १३४ कसोटींत ८७८१ धावा, तर ८६ वनडेत २३३८ धावा काढल्या. त्याला संकटमोचक म्हणून ओळखले जाते.

ही जबाबदारी मिळू शकते
१. भारतीय क्रिकेटपटू या तिघांचा सल्ला घेऊ शकतील. कोणत्याही कठीण आंतरराष्ट्रीय मालिकेपूर्वी भारतीय खेळाडूंनी खास सचिनशी चर्चा करावी, असे मंडळाला वाटते.
२. विदेश दौ-यात यश मिळवण्यासाठी गांगुलीकडून ब्ल्यूप्रिंट तयार करण्यात मदत घेतली जाऊ शकते.
३. लक्ष्मणकडे बेंच स्ट्रेंथ आणि नवी गुणवत्ता शोधण्याचे काम दिले जाऊ शकते. लक्ष्मण क्रिकेटच्या बारीक पैलूंत तज्ज्ञ असल्याने त्याच्याकडे हे काम दिले जाऊ शकते.