आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात कर्णधार बदलले, तरीही नशीब रुसलेलेच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली डेअरडेव्हिल्स आयपीएलमध्ये अशी टीम आहे, जिने नऊ वर्षांत सात कर्णधार बदलले. तरीही त्यांचे प्रदर्शन समाधानकारक राहिले नाही. आता नव्या सत्राची सुरुवातही चांगली झाली नाही. दिल्लीला कोलकाता नाइट रायडर्सने ९ विकेटने हरवले. दिल्लीसाठी हा सर्वात लाजिरवाणा पराभव ठरला. दिल्लीचा अवघ्या १७.४ षटकांत ९८ धावांत खुर्दा उडाला. दिल्लीचा आताचा कर्णधार आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खानसुद्धा डेअरडेव्हिल्सला प्रेरित करू शकला नाही. आयपीएलच्या पहिल्या सत्रात वीरेंद्र सेहवाग दिल्लीचा कर्णधार होता. २००९ मध्ये दुसऱ्या सत्रातसुद्धा सेहवाग कर्णधार होता, तर २०१० मध्ये तिसऱ्या सत्रात गौतम गंभीरला कर्णधार बनवण्यात आले. तिसऱ्या सत्रात काही सामन्यांत गंभीर खेळू शकला नाही तर विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकने त्या सामन्यात दिल्लीचे नेतृत्व केले होते. २०११ आणि २०१२ मध्ये सेहवाग पुन्हा कर्णधार बनला. २०१३ मध्ये श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज महेला जयवर्धनेला दिल्लीचे कर्णधारपद देण्यात आले.
२०१४ मध्ये इंग्लंडचा दिग्गज फलंदाज केविन पीटरसनला दिल्लीचे कर्णधारपद देण्यात आले. मात्र, बोटाच्या दुखापतीमुळे तो सुरुवातीच्या काही सामन्यांत खेळू शकला नाही. त्या सामन्यात कार्तिकने नेतृत्व केले. २०१५ मध्ये द. आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जे.पी. डुमिनी दिल्लीचा कर्णधार बनला.
नवव्या सत्रात जहीर खानला दिल्लीचे कर्णधारपद मिळाले. मात्र, त्याची सुरुवात चांगली झाली नाही. या पराभवानंतरही जहीर खान अाशान्वित आहे. आपणाला प्रत्येक सामन्यात काही ना काही शिकण्यास मिळते, असे जहीर म्हणतो.

दिल्लीचा पुढचा सामना पंजाबसोबत रंगणार
दिल्लीचा पुढचा सामना किंग्ज इलेव्हन पंजाबसोबत फिराेजशाह कोटलाच्या मैदानावर १५ एप्रिल रोजी आहे. जहीरला लवकरात लवकर काही सामन्यांत दिल्लीचे नशीब बदलावे लागेल. २०१५ मध्ये आठ संघांत दिल्लीने सातवे स्थान पटकावले होते. दिल्लीने केवळ ११ गुण मिळवले. २०१४ मध्ये दिल्लीने आठवे स्थान मिळवले. २०१३ मध्ये दिल्लीने ९ संघांत १६ सामन्यांत १३ पराभवासह अखेरचे स्थान गाठले होते.