आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्षाच्या बळावर गाठला सुवर्णपदकाचा पल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - घरच्या जेमतेम परिस्थितीमुळे जलतरण केंद्रावर जाण्यासाठी वाहन नसल्यामुळे वयाच्या १० व्या वर्षी दररोज १० ते १२ कि.मी. पायपीट करायची, घरी जे अन्न शिजेल ते विनातक्रार खायचे, कधी १२ वीची परीक्षाही खेळासाठी सोडायची, भारतीय शिबिरात निवड झाल्यानंतर आपल्या जागी दुसऱ्याच खेळाडूचे नाव ऐनवेळी संघात घेतले याचे अपार दु:ख पचवून कोणतीही तक्रार न करता घरी परत यायचे. मनातील मळभ झटकून पुन्हा कधी तरी संधी मिळेल, असा निर्धार करत नव्याने सरावाला लागायचे व यश मिळवायचे, असा खडतर प्रवास वाॅटरपोलाे खेळाडू निशा बोंडे, सांजली वानखडे व शिवम गाडगे यांचा राहिला आहे.

नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या दक्षिण आशियाई २० वर्षांखालील गटाच्या जलतरण स्पर्धेतील वाॅटरपोलो या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय भारतीय ज्युनियर मुले व मुलींच्या संघातील हुकमी खेळाडू राहिलेल्या निशा, सांजली व शिवमने संघाला यश मिळवून देण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही.

मी राज्य संघाकडून नेहमी चांगली कामगिरी केली. याआधी दोन्ही वेळा रौप्यपदक विजेत्या संघातील सदस्य राहिल्यानंतरही माझी भारतीय संघात वर्णी लागली नाही. माझ्या जागी दुसऱ्याच कुणाला तरी संघात घेण्यात आले. तरीही न डगमगता मी सराव आणि स्पर्धेत सहभागी होत राहिले. जिद्द व निर्धार कायम ठेवल्याने माझी भारतीय संघात निवड झाली. या संधीचे मी सोने केले, अशी माहिती निशा बाेंडे या खेळाडूने दिली.

माझ्याकडे तात्पुरती गाेलरक्षणाची जबाबदारी होती. माझी कामगिरी संघाच्या प्रशिक्षकांना आवडली. त्या वेळपासून भारतीय संघाची गोलरक्षक म्हणून मी सतत उत्तम कामगिरी करत आहे. द. आशियाई स्पर्धेत मी प्रतिस्पर्धी संघाचे ६० टक्के गोल रोखण्यात यश मिळवल्याने संघ यशस्वी ठरला, असे सांजली वानखडेने सांगितले.

वडिलांचे अनमाेल प्राेत्साहन
गवंडी काम करणाऱ्या वडिलांनी प्रोत्साहन दिले. प्रथम राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्यावर १२ वीची परीक्षा न देण्याचा निर्णयालाही त्यांनी पाठिंबा दिला. आई १२ कि.मी. पायपीट करत जलतरणिकेवर घेऊन यायची. त्याचे फळ मिळाले, असे शिवम म्हणाला.
बातम्या आणखी आहेत...