आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Brazil Beat Chile On Penalties To Reach World Cup Quarter finals

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA WC : पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्राझील 4-3 ने विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेलोहॉरिझोंटे - अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या प्री-क्वार्टरच्या लढतीत यजमान ब्राझीलने चिलीला 4-3 ने पराभूत करून फिफा विश्वचषक स्पध्रेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. निर्धारित वेळेत 1-1 ची बरोबरी आणि त्यानंतर अतिरिक्त वेळेतही सामन्याचा निकाल न लागल्याने पेनल्टी शूटआऊटचा सहारा घेण्यात आला. यात चिलीने 2 तर ब्राझीलने 3 गोल करत विजय मिळवला. पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्राझीलचा डेव्हिड लुईस, मार्सेलो आणि नेमार यांनी गोल केले. तर, चिलीकडून अँरनगुईज आणि डियाज यांनी गोल केले. पेनल्टी शूटआऊटमध्ये नेमारने केलेला गोल ब्राझीलसाठी विजयी ठरला. यात हल्कने केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. चिलीकडून पिनिला, ए.सांचेझ आणि डियाजदेखील शूटआऊट पेनल्टी करण्यात यशस्वी होऊ शकले नाहीत.

या लढतीत दोन्हीही संघांनी दमदार खेळाचे प्रदर्शन केले. ब्राझीलने 4-2-3-1, तर चिलीने 5-3-2 च्या शैलीने आक्रमणाची रचना केली होती. सामन्याच्या सुरुवातीपासूनच ब्राझीलने सामन्यांवर पकड बनवायला सुरुवात केली होती. चपळ स्ट्रायकर नेमार ज्युनियरने पहिल्या फळीतील हल्क, फ्रेड आणि ऑस्करसोबत काही तीव्र हालचाली केल्या. मात्र, चिलीच्या बचावफळीने त्यांना यश मिळू दिले नाही. सामन्याच्या 18 व्या मिनिटाला नेमारने कॉर्नर घेत चेंडू गोलपोस्टकडे ढकलला आणि डिफेंडर डेव्हिड लुइसने अचूक किक मारत चेंडूला थेट गोलपोस्टचा रस्ता दाखवला. पहिल्या हाफमध्ये नेमारने कित्येकदा पेनॉल्टी बॉक्समध्ये प्रवेश केला. मात्र, तो गोल करण्यात अपयशी ठरला. दरम्यान, सामन्याच्या 31 व्या मिनिटाला चिलीच्या खेळाडूंनी अचानक आक्रमण वाढवले.

ब्राझीलच्या खेळाडूंना याविषयी काही कळायच्या आतच डाव्या कॉर्नरवरून मूव्ह बनवत ए. सांचेझने गोलकीपर ज्युलियस सीझरला चकमा दिला आणि शानदार गोल करत सामना 1-1 ने बरोबरीत आणला. या अकस्मात हल्ल्यानंतर ब्राझीलच्या खेळाडूंनी आक्रमण तीव्र करायला सुरुवात केली. सामन्याच्या 40 व्या मिनिटाला नेमारने चेंडूवर लीलया नियंत्रण मिळवत गोलपोस्टकडे आगेकूच केली. दरम्यान, चिलीचा डिफेंडर सिल्व्हाला चकवत त्याने चेंडू फ्रेडकडे पास केला. मात्र, फ्रेडची किक गोलपोस्टच्या वरून गेली.

दुसर्‍या हाफच्या पहिल्या दहा मिनिटांत ब्राझीलचा हल्क आणि फर्नांडिनो तसेच चिलीच्या सिल्व्हाने काही उत्कृष्ट चाली केल्या. मात्र, त्यात ते अयशस्वी ठरले. दुसर्‍या हाफच्या 11 व्या मिनिटाला नेमारने केलेला हेडर चिलीचा गोलकीपर ब्राव्होने परतावून लावला. दरम्यान, सामन्याच्या 85 व्या आणि 90 व्या मिनिटाला चिलीकडून जोरदार आक्रमण झाले. मात्र, त्यांच्या छोट्या छोट्या पासेसमुळे ते अयशस्वी ठरले. त्यामुळे निर्धारित वेळेत सामना 1-1 ने बरोबरीत सुटला.