फोर्टलेजा - विजेतेपदाचा प्रबळ दावेदार ब्राझील आणि शानदार फॉर्ममध्ये असलेल्या कोलंबियादरम्यान शुक्रवारी मध्यरात्री क्वार्टर फायनलची झुंज बघायला मिळणार आहे. मध्यरात्री 1.30 वाजता सुरू होणार्या या सामन्याबाबत प्रेक्षकांत बरीच उत्सकुता लागलेली आहे.
घरच्या मैदानावर खेळत असलेल्या ब्राझीलच्या संघावर फिफा विश्वचषकात सहाव्यांदा किताब जिंकण्याचा दबाव असणार आहे. कारण नॉकआऊट फेरीदरम्यान ब्राझीलला नवख्या चिलीने विजयासाठी चांगलेच झुंजवले होते. या सामन्याचा निकाल थेट पेनॉल्टी शूटआऊटमध्ये लागला होता. त्यामुळे ब्राझीलवर चोहोबाजूने टीका झाली होती. आपला संघ सध्या मनोवैज्ञानिक दबावाचा सामना करत असल्यामुळे यापुढे अत्यंत कठोर मार्गक्रमण करावे लागणार आहे, असे ब्राझीलचे प्रशिक्षक फेलिप स्कोलारी यांनी म्हटले आहे. 1980 च्या दशकातील महान ब्राझीलियन फुटबॉलपटू जिको यांनी ब्राझीलच्या सध्याच्या संघाच्या रणनीतीवर प्रचंड टीका करत संघाने एकट्या नेमारवर अवलंबून न राहण्यास सांगितले आहे.
गुस्ताव्हो ठरतोय डोकेदुखी
चिलीविरुद्ध सामन्यात निलंबित करण्यात आलेला मिडफील्डर लुईज गुस्ताव्हो सध्या ब्राझीलचे प्रशिक्षक स्कोलारी यांच्यासाठी डोकेदुखी ठरतोय. त्यामुळे संभवत: अन्य मिडफील्डर रामिरेज याला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
रॉड्रिग्ज कोलंबियाचा स्टार
कोलंबियाचा संघ सध्या उत्साह आणि नव्या जोमाने खेळताना दिसतोय. संघाने स्पध्रेतील आपल्या चारही लढती जिंकल्या असून त्यात 11 गोल केले आहेत. याउलट त्यांच्याविरुद्ध खेळताना प्रतिस्पर्धी संघ फक्त दोनच गोल करू शकले आहेत. मिडफील्डर जेम्स रॉड्रिग्ज हा कोलंबियाचा स्टार खेळाडू असून त्याच्यावर संघाची मदार आहे. त्याने या स्पध्रेत आतापर्यंत सर्वाधिक पाच गोल केले आहेत. ब्राझीलचे प्रशिक्षक स्कोलारी यांनीही रॉड्रिग्ज हा या सामन्यातील मुख्य अडथळा असल्याचे म्हटले आहे.
नेमारवरच स्कोलारींचा विश्वास
यंदाच्या विश्वचषकातील ब्राझीलच्या सर्व सामन्यांत नेमारची कामगिरी प्रशंसनीय ठरली आहे. त्यामुळे त्यांचा संपूर्ण संघ एकट्या नेमारवरच एकटवला असल्याचे चित्र आहे. त्याने स्पध्रेत आतापर्यंत 4 गोल केले असून अजूनही त्याच्याकडून अपेक्षा आहे. स्पध्रेपूर्वी गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या नेमारला सराव सत्रात अनुपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे कधीही वेळेवर त्याच्याकडून धोका होऊ शकतो.
जर्मनीसमोर आज फ्रान्सचे आव्हान
तीन वेळचा विजेता आणि विजेतेपदाचा प्रबळ दावेदार जर्मनीच्या संघासमोर शुक्रवारी पहिल्या उपांत्यपूर्व लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी फ्रान्सचे आव्हान असणार आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या या लढतीत कोणताही संघ पराभूत झाला तरी स्पध्रेतील सर्वात मोठी उलथापालथ बघायला मिळणार आहे. जर्मनीने आतापर्यंत तीन वेळा विश्वविजेतेपदावर नाव कोरले आहे, तर फ्रान्सने 1998 मध्ये स्वत:च्याच भूमीवर विजेतेपद पटकावले होते. मात्र, विश्वचषकातील आकडेवारीचा विचार केल्यास जर्मनीने आतापर्यंत दोन उपांत्य लढतीत फ्रान्सला स्पध्रेबाहेर केले आहे.
(फोटो - नेमार)