आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIFA WC : बारा वर्षांनंतर प्रथमच ब्राझीलचा उपांत्य फेरीत प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोर्टालेजा - कोलंबियाविरुद्धचा आपला 23 वर्षे जुना विजयी रेकॉर्ड कायम ठेवत ब्राझीलने शुक्रवारी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. यजमान संघाने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या दुसर्‍या उपांत्यपूर्व लढतीत कोलंबियाचा 2-1 ने पराभव केला. थियागो सिल्व्हा आणि डेव्हिस लुईस यांनी ब्राझीलकडून प्रत्येकी एक गोल केला. 2002 नंतर प्रथमच ब्राझीलचा संघ उपांत्य लढतीपर्यंत पोहोचू शकला आहे. 2006 आणि 2010 मध्ये त्यांचे उपांत्यपूर्व फेरीतच आव्हान संपुष्टात आले होते.

सामन्याच्या सातव्याच मिनिटाला ब्राझीलच्या संघाला एक कॉर्नर मिळाला. याचा पुरेपुर फायदा उचलत नेमारने शानदार किक मारली. दरम्यान, चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी झालेल्या चढाओढीदरम्यानच ब्राझीलचा कर्णधार थियागो सिल्व्हाने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. या सामन्याचा दुसरा गोल अप्रतिम होता. सामन्याच्या 69 व्या मिनिटाला ब्राझीलला एक फ्रि किक मिळाली. डेव्हिस लुईसने गोलपोस्टपासून 32 मीटर अंतरावरुन किक मारत नेत्रदिपक गोल करून आघाडी 2-0 वर नेऊन ठेवली. दुसरीकडे, सामन्याच्या 80 व्या मिनिटाला कोलंबियाने पहिला गोल केला. गोलपोस्टकडे जात असलेल्या कोलंबियाच्या खेळाडूला ब्राझीलचा गोलकिपर सीजरने जमीनीवर पाडून टाकले. त्यामुळे कोलंबियाला पेनल्टी मिळाली. जेम्स रॉड्रिग्जने या पेनल्टीचा फायदा उचलत आघाडी 2-1 वर आणली. मात्र, तो संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही.

सिल्व्हाला पिवळा कार्ड
ब्राझीलचा कर्णधार थियागो सिल्व्हाला सामन्याच्या 64 व्या मिनिटाला पंचानी पिवळा कार्ड दाखवला. स्पध्रेत आतापर्यंत दोनवेळा पिवळा कार्ड मिळाल्यामुळे त्याला आता पुढील लढत खेळता येणार नाही. नेमारही या सामन्यात दुखापतग्रस्त झाला असून सामना संपायच्या पाच मिनिटांपूर्वी तो जखमी झाल आणि त्याला स्ट्रेचवर टाकून मैदानाबाहेर नेले होते. त्यामुळे त्याच्याही खेळण्याबाबत साशंकता आहे.

रॉड्रिग्ज विक्रमवीर
सलग पाच सामन्यात गोल करून कोलंबियाच्या रॉड्रिग्जने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विश्वचषकात अशी कामगिरी आतापर्यंत फक्त 12 खेळाडूंनी केली आहे. यापैकी दोनच खेळाडू असे आहेत ज्यांनी सहा सामन्यांमध्ये गोल केले होते.
(फोटो - डेव्हिस लुईस आणि नेमार)