सुट्रीबा - सलामी सामन्यातील पराभवातून सावरलेल्या इक्वाडोरने शनिवारी पहाटे फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत विजयाचे खाते उघडले. या टीमने इ ग्रुपमध्ये दुस-या सामन्यात होंडुरसचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. यासह इक्वाडोरने स्पर्धेत तीन गुणांची कमाई केली. आता इक्वाडोरचा स्पर्धेतील तिसरा सामना फ्रान्सशी होईल.
एन्नेर व्हॅलेसिआने (34, 65मि.) शानदार दोन गोल करून इक्वाडोरला विजय मिळवून दिला. होंडूरसकडून कार्लो कोस्टलीने 31 व्या मिनिटाला केलेला गोल व्यर्थ ठरला.
विजयाचे खाते उघडण्यासाठी उत्सुक असलेल्या इक्वाडोर आणि होंडूरस यांच्यातील सामना रंगतदारपणे खेळवला गेला. 31 व्या मिनिटाला कोस्टलीने होंडूरसला सामन्यात दमदार सुरुवात करून दिली. त्याने पहिला गोल करून इक्वाडोरला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटात इक्वाडोरने दमदार पुनरागन केले. एन्नेरने 34 व्या मिनिटाला पहिला गोल करून इक्वाडोरला 1-1 ने बरोबरी मिळवून दिली. त्याने त्यानंतर दुस-या हाफमध्ये दुसरा गोल केला. या गोलच्या बळावर इक्वाडोरने सामना जिंकला.