अर्जेंटिनाचा आजचा 'बर्थडे बॉय' लियोनेल मेसी जबरदस्त फॉर्मात असून गोलचा धमाका उडवण्यासाठी सज्ज झाला आहे. आज मेसीचा 27 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिनी संघाला भक्कम विजय मिळवून देण्यासाठी मेसीही तयार असेल. मेसीच्या अर्जेंटिनाचा सामना बुधवारी नायजेरियाशी होईल.
नॉकआऊटमधील प्रवेशासाठी उत्सुक असलेला अर्जेंटिना संघ विजयासाठी सज्ज झाला आहे. दुसरीकडे नायजेरिया अंतिम 16 च्या उंबरठय़ावर आहे. ही लढत ड्रॉ झाल्यासही नायजेरियाला आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे. मात्र, धडाकेबाज विजयावरच नायजेरिया संघ भर देणार असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत अर्जेंटिना आणि नायजेरिया यांच्यात सहा सामने झाले. त्यापैकी चार सामन्यांत अर्जेंटिना आणि एका सामन्यात नायजेरियाने विजयी पताका फडकवली. तसेच एक सामना बरोबरीत राहिला होता.
इक्वेडोरला शेवटची संधी
इक्वेडोरला फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत बुधवारी बलाढय़ फ्रान्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. इ गटातील हा सामना इक्वेडोर संघासाठी करा वा मरासारखा आहे. दुसरीकडे नॉकआऊटमध्ये स्थान पटकावणारा फ्रान्स संघ विजयासाठी सज्ज आहे. इक्वेडोरचे एकूण तीन गुण आहेत. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एक सामना झाला होता. यात फ्रान्सने बाजी मारली होती.
इराण विजयाच्या प्रतीक्षेत!
इराण संघ 1998 पासून फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत विजय मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहे. तब्बल 16 वर्षांपूर्वी इराणला वर्ल्डकपमध्ये एकाच वेळी विजयाचे खाते उघडता आले होते. आता इराणचा सामना बुधवारी बोस्नियाशी होणार आहे.
(फोटोओळ - गोल नोंदवताना मेसीची टिपलेली भावमुद्रा)