रिओ दि जानेरिओ - ब्राझीलमध्ये सुरू झालेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सध्या एकूण 50 हजार स्वयंसेवक अविरत कार्यरत आहेत. हे सेवा कार्यरत करणारे केवळ ब्राझीलमधीलच स्वयंसेवक नाहीत. यात जगभरातील फुटबॉलप्रेमींचा समावेश आहे.
नागपुरातील ओमप्रकाश मुंदडा हे पत्नी प्रेमसोबत स्टेडिमयमध्ये सेवा पुरवत आहेत. एका स्टेडियमच्या देखभालीसाठी तब्बल दोन ते तीन हजार स्वयंसेवक लागतात. याच्या अभावामुळे स्पर्धेच्या आयोजनाचा फज्जा उडाला असता. त्यासाठीच स्पर्धा आयोजकांनी जगभरातून प्रवेशिका मागवल्या होत्या. यातून तब्बल 50 हजार स्वयंसेवकांची निवड करण्यात आली. यात भारताच्या दोन जणांचा समावेश आहे.
कोलंबियाच्या 1427, अमेरिकेच्या 772 चाहत्यांना यासाठी संधी मिळाली आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला हे सर्व स्वयंसेवक सराव करतात आणि सामन्याच्या दिवशी सकाळपासून स्टेडियममध्ये सेवा पुरवण्यासाठी सज्ज होतात. यादरम्यान त्यांना एकवेळचे जेवण व पाण्याची बाटली मोफत पुरवली जाते. तसेच येण्या-जाण्यासाठी शंभर रुपयांचा प्रवासखर्च दिला जातो. स्थानिक चाहत्यांना हे परवडते. मात्र, विदेशातील स्वयंसेवकांना आपल्या कार्यासाठी खिशातून पैसे खर्च करावे लागतात. या तोकड्या खर्चात त्यांना या ठिकाणी राहणेही परवडत नाही. या वेळी जपानहून मुकुतो नावाचे एक गृहस्थ या ठिकाणी सेवा देण्यासाठी आले आहेत. स्वत:जवळचे चार लाख रुपये खर्च करून ते या ठिकाणी सेवा देत आहेत. एवढा पैसा खर्च करूनही या सेवा पुरवणार्यांना सामन्यांचा आनंदही लुटता येत नाही.