बेलो हॉरिझेंटा - फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत स्टार खेळाडू लियोनेल मेसीने (90+1 मि.) शानदार गोल करून अर्जेंटिनाला एफ ग्रुपमध्ये शानदार विजय मिळवून दिला. या संघाने शनिवारी रात्री इराणचा 1-0 अशा फरकाने पराभव केला. अर्जेंटिनाचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. मेसीच पहिल्या सामन्यातील अर्जेंटिनाच्या विजयाचा हीरो ठरला होता. या विजयाच्या बळावर अर्जेंटिनाने एफ ग्रुपमध्ये सहा गुणांसह गुणतालिकेत आपले अव्वल स्थान मजबूत केले.
निर्धारित वेळेपर्यंत हा सामना शून्य गोलने बरोबरीत रंगला होता. त्यानंतर मिळलालेल्या अतिरिक्त वेळेत मेसीने चमत्कार घडवला. त्याने 91 व्या मिनिटाला इराणच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत गोल केला. या गोलच्या बळावर अर्जेंटिनाने 1-0 ने आघाडी घेतली. इराणने बरोबरीसाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. अर्जेंटिनाचा तिसरा सामना बुधवारी नायजेरियाशी होईल.
मेसीचा दुसरा गोल
यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सध्या अर्जेंटिनाचा लियोनेल मेसी जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने आतापर्यंत झालेल्या दोन लढतीत दोन गोल केले आहेत. याशिवाय तो या दोन्ही सामन्यांमध्ये विजयाचा शिल्पकार ठरला आहे. शनिवारी इराणविरुद्ध लढतीत त्याने अतिरिक्त वेळेत रोमांचक गोल करून अर्जेंटिनाचा विजय निश्चित केला. तसेच यापूर्वी झालेल्या बोस्नियाविरुद्ध लढतीत मेसीने 65 व्या मिनिटाला केलेला गोल महत्त्वपूर्ण ठरला होता. याच गोलच्या बळावर अर्जेंटिनाने सामन्यात बाजी मारली होती.
अतिरिक्त वेळेत मेसीने गोल करून अर्जेंटिनाचा विजय निश्चित केला.