मुंबई - विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारताचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरीही आज 13 हजार भारतीयांचा अप्रत्यक्ष सहभाग जगाला दिसणार आहे. आज रात्री साओ पावलो येथील स्टेडियमवर जगातील सर्वात मोठ्या फ्लॅगचे अनावरण होणार आहे. त्या फ्लॅगवर जगातील 2 लाख 19 हजार फुटबॉल शौकिनांची छबी झळकणार आहे. त्यामध्ये 13 हजार भारतीयांचे चेहरेही असतील.
स्टेडियमवर उपस्थित 65 हजार प्रेक्षक व जगातील अब्जाहून अधिक फुटबॉलरसिक कोकाकोलाच्या त्या ‘हॅपिनेस फ्लॅगचे’ अनावरण होताना पाहतील. फ्लॅगसाठी जगभरातल्या फुटबॉल शौकिनांकडून 207 देशांमधून प्रवेशिका मागवण्यात आल्या होत्या. त्यापैकी एकट्या भारतातून 13 हजार शौकिनांनी प्रवेशिका पाठवल्या होत्या. हा दुस-या क्रमांकाचा सर्वोच्च सहभाग आहे. यजमान ब्राझीलच्या फुटबॉल शौकिनांनीच यापेक्षा अधिक प्रवेशिका पाठवल्या होत्या. मैदानावरच्या फुटबॉलमध्ये नाही, तर प्रवेशिकांच्या फुटबॉलमध्ये भारताने जर्मनी, अर्जेंटिना, स्पेन, इटली यांच्यासारख्या माजी विश्वविजेत्यांनाही मागे टाकले आहे.