रिओ दि जानेरीओ - गत 2010 चा चॅम्पियन स्पेन संघावर लाजिरवाण्या पराभवासह यंदाच्या वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली आहे. चिली संघाने बुधवारी मध्यरात्री रोमांचक लढतीत गतविजेत्या स्पेनला 2-0 अशा फरकाने धुळ चारली. यासह चिलीने स्पर्धेत सलग दुस-या विजयाची नोंद केली.
बी ग्रुपमध्ये चिली आणि स्पेन यांच्यात सामना रंगला होता. विजयी ट्रॅकवर येण्याचा स्पेनने लढतीत प्रयत्न केला. मात्र, चिलीने हे मनसुबे उधळून लावले. चिलीच्या खेळाडूने सामन्यादरम्यान शेवटच्या मिनिटांपर्यंत आपला दबदबा कायम ठेवला. त्यामुळेच चिली संघाला सलग दुस-या विजयाची नोंद करता आली. यापूर्वी चिली संघाने स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला धुळ चारली होती.
एडवर्डो, चार्ल्स हीरो : एडवर्डो वर्गाज (20मि.) आणि चार्ल्स अरांगुइज (43मि.) हे चिली संघाच्या एकतर्फी विजयाचे खरे हिरो ठरले. लढतीच्या 20 व्या मिनिटाला एडवर्डोने स्पेनच्या गोलरक्षक आणि डिफेंडरला हुलकावणी देत गोल करून चिलीला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. त्यापाठोपाठ 43 व्या मिनिटाला चार्ल्सने दुसरा गोल करून चिलीचा विजय निश्चित केला. या गोलच्या बळावर चिली संघाने पहिल्याच हाफमध्ये 2-0 ने आघाडी घेत सामन्यावर घट्ट पकड घेतली होती.
पाचव्यांदा चॅम्पियन बाहेर : वर्ल्डकपच्या इतिहासात पाचव्यांदा चॅम्पियन टीमला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. यापूर्वी, वर्ल्डकपवरचे वर्चस्व कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या इटली (1950,2010), ब्राझील (1966) आणि फ्रान्स (2002) या संघांना बाहेर पडावे लागले होते.
यंदा नवा चॅम्पियन!
दोन पराभवाने स्पेन टीमचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आहे. यातुनच यंदाच्या वर्ल्डकपमध्ये नव्याने चॅम्पियन मिळण्याची शक्यता आहे.
सलग दोन पराभवाने स्पेन संघाचा घात
सलगच्या दुस-या पराभवामुळे स्पेनचा घात झाला. त्यामुळे या टीमला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. यापूर्वी सलामी सामन्यात स्पेनला गतउपविजेत्या हॉलंडनेही 5-1 अशा फरकाने पराभूत केले होते.
विसेंटचे डावपेच चिलीने उधळले
प्रशिक्षक विसेंट डेल बोस्क्यु यांनी चिलीविरुद्ध 4-2-3-1 अशा प्रकारचा डावपेच आखला होता. मात्र, हा डावपेच शेवटच्या मिनिटांपर्यंत यशस्वी होऊ शकला नाही. चिलीने 3-4-1-2 या प्रभावी डावपेचाने स्पेनचा पराभव केला.
2-0 ने चिलीने जिंकला सामना
02 वेळा स्पेन स्पर्धेतून बाहेर
05 व्यांदा चॅम्पियन संघ बाहेर
20 व्या मिनिटाला पहिला गोल(एडवर्डो, चिली)
43२वा मिनिट, दुसरा गोल (चार्ल्स, चिली)
स्पेनचे दिग्गज अपयशी
चिलीविरुद्ध सामन्यात रामोस, सिल्वा, इनिस्ता, पेड्रो आणि डिएगो कोस्टासारख्या दिग्गज खेळाडू गतविजेत्या स्पेनच्या ताफ्यात होते. मात्र, या सर्वच स्टार खेळाडूंना लढतीत कोणत्याही प्रकारची चमत्कारीक कामगिरी करता आली नाही. परिणामी स्पेनला पराभवाला सामोरे जावे लागले. स्पेनच्या खेळाडूंनी 15 वेळा गोलसाठी प्रयत्न केले. मात्र, चिलीच्या गोलरक्षकाने स्पेनच्या खेळाडूंचा गोलचा प्रयत्न उधळून लावला.