ब्रासिलिया - जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या कोलंबियाने फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सलग दुस-या विजयाची नोंद केली. या टीमने सी ग्रुपच्या दुस-या सामन्यात गुरुवारी रात्री आयव्हरी कोस्टचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. या विजयाच्या बळावर कोलंबियाने सहा गुणांसह गुणतालिकेतील अव्वल स्थान अधिक मजबूत केले. तसेच तीन गुणांसह दुस-या स्थानी असलेल्या आयव्हरी कोस्टचा हा पहिला पराभव ठरला.
जेम्स रोडग्रेज (64 मि.) आणि जुआन क्विंटेरो (70 मि.) यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर कोलंबियाने सामना जिकंला. आयव्हरी कोस्ट संघासाठी गार्व्हिनोने (73 मि.) केलेला गोल व्यर्थ ठरला. तसेच या टीमचा सामन्यातील हा एकमेव गोल ठरला. फॉर्मात असलेल्या कोलंबिया संघाचा स्पर्धेतील तिसरा सामना आता मंगळवारी जपानशी होईल.
सलग दुस-या विजयासाठी सज्ज असलेल्या कोलंबिया आणि आयव्हरी कोस्ट यांच्यात रंगतदार लढत झाली. मध्यतरांपर्यंतच्या तुल्यबळ खेळीने ही लढत शून्य गोलने बरोबरीत रंगली होती. अखेर, दुस-या हाफमध्ये रोडग्रेजने कोलंबियाकडून गोलचे खाते उघडले. त्याने 64 व्या मिनिटाला आयव्हरीच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत पहिल्या गोलची नोंद केली होती.