फोर्टलेझा - जबरदस्त फॉर्मात असलेल्या जर्मनी संघाने फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी मध्यरात्री घानाला 2-2 अशा फरकाने बरोबरीत रोखले. मिरोस्लाव क्लोजने 71 व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर जर्मनीला पराभवाचे संकट दुर करता आले. यासह दोन्ही संघास प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. जर्मनीकडून मारियो गोटेझनेही (51मि.) गोल केला. तसेच घानासाठी ए.अवेई (54 मि.) आणि ग्यान (63 मि.) यांनी सामन्यात प्रत्येकी एक गोल केला. आता जर्मनीचा तिसरा सामना गुरुवारी अमेरिकेशी होईल. अमेरिका एका विजयासह दुसºया स्थानावर आहे. तसेच जर्मनीने पोर्तुगालला नमवून स्पर्धेत दमदार सुरुवात केली. आता चार गुणांसह जर्मनी अव्वलस्थानी कायम आहे.
सलामी सामन्यातील विजयाने आत्मविश्वास बुलंदीवर असलेल्या जर्मनीने जी गु्रपमध्ये घानाविरुद्ध सामन्यात दमदार सुरुवात केली. दुसरीकडे विजयासाठी उत्सुक असलेल्या घानानेही जर्मनीच्या आव्हानाला चोख प्रत्युत्तर देत खेळी केली. त्यामुळे मध्यतरांपर्यंत ही लढत शुन्य गोलने बरोबरीत रंगली होती. दरम्यान, जर्मनी संघाने अनुभवी स्टार क्लोज आणि स्वांसटायगर या दोन हुकमी एक्क्यांना वापरण्याचा निर्णय घेतला. यात क्लोजने शानदार कामगिरी करून संघाचा पराभव टाळला. लढतीत गोटेजेही शानदार कामगिरी केली. यासह जर्मनीला आपला दबदबा कायम ठेवता आला.
जर्मनीचे पुनरागमन
मध्यतरांनंतर जर्मनी संघाने सामन्यात दमदार पुनरागमन केले. मारिया गोटेझेने सामन्याच्या 51 व्या मिनिटाला गोलचे खाते उघडले. त्याने घानाच्या गोलरक्षकाला हुलकावणी देऊन गोल केला. या गोलच्या बळावर त्याने जर्मनीला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. सब्सिट्यूटच्या आधारे जर्मनीच्या स्टार क्लोजने 71 व्या मिनिटाला गोल केला. या गोलच्या बळावर त्याने पिछाडीवर असलेल्या जर्मनीला 2-2 ने बरोबरी मिळवून दिली. यासह जर्मनीवरचे पराभवाचे सावट दुर करता आले.
क्लोजची विश्वविक्रमाशी बरोबरी
जर्मनीचा स्टार मिरोस्लाव क्लोजने शनिवारी मध्यरात्री घानाविरुद्ध एक गोल केला. यासह त्याने एका नव्या विक्रमाची बरोबरी साधण्याचा पल्ला यशस्वी गाठला. त्याने वर्ल्डकपमध्ये 15 गोल करण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी साधली. यापूर्वी, हा विक्रम ब्राझीलच्या रोनाल्डोच्या नावे होता. त्याने वर्ल्डकपच्या 19 सामन्यात या विक्रमाला गवसणी घातली होती. क्लोज चौथ्या वर्ल्डकपमध्ये जर्मनीचे प्रतिनिधीत्व करत आहे. त्याने 2002 आणि 2006 च्या वर्ल्डकपमध्ये प्रत्येकी पाच गोल केले होते. तसेच मागील वर्ल्डकपमध्ये चार गोल केले होते. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये क्लोजला शनिवारी रंगलेल्या सामन्यात 69 व्या मिनिटाला जर्मनीकडून सब्सिट्यूटच्या आधारे मैदानावर उतरण्याची संधी मिळाली. याच संधीचे सोने करत क्लोजने ही उल्लेखनिय कामगिरी केली. यासह तो वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ठरला.
अवेई, ग्यानची खेळी
पिछाडीवर पडलेल्या घानाने गोलसाठी जोरदार प्रयत्न सुरु केले. अखेर, 54 व्या मिनिटाला अवेईने घानाकडून पहिला गोल केला. यासह त्याने लढतीत संघाला 1-1 ने बरोबरीत मिळवून दिली. त्यानंतर ग्यानने अवघ्या नऊ मिनिटांमध्ये घानाला 2-1 ने आघाडी मिळवून दिली. त्याने 63 व्या मिनिटाला हे यश गवसले. मात्र, त्यांना घानाला विजय मिळवून देता आला नाही.
नायजेरिया 1-0 ने विजयी
नायजेरियाने विश्वचषकाच्या एफ गु्रपमध्ये रविवारी पहाटे विजयाचे खाते उघडले. या संघाने स्पर्धेतील आपल्या दुसºया सामन्यात बोस्नियाचा 1-0 अशा फरकाने पराभव केला. पीटरने 29 व्या मिनिटाला गोल करून नायजेरियाला विजय मिळवून दिला. नायजेरियाने चार गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले.