बेलो होरिजोंटे - सहाव्या किताबापासून अवघ्या दोन पावलांवर असलेला ब्राझील संघ फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य सामन्यातील विजयासाठी सज्ज झाला आहे. ब्राझील आणि जर्मनी यांच्यात मंगळवारी मध्यरात्री महामुकाबला रंगणार आहे. पाच वेळचा विजेता ब्राझील संघाचा उपांत्य सामना जिंकून अंतिम फेरी गाठण्याचा प्रयत्न असेल. तसेच तीन वेळचा चॅम्पियन जर्मनीही विजयासाठी प्रयत्नशील आहे.
यजमान ब्राझील संघ सध्या फॉर्मात आहे. सलगच्या विजयासह या संघाने अंतिम चारमधील आपले स्थान निश्चित केले आहे. आता हीच विजयाची लय उपांत्य लढतीतही कायम ठेवण्याचा यजमानांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे नेमारच्या अनुपस्थितीत दुबळ्या ठरलेल्या ब्राझीलला धूळ चारण्याचा जर्मनीचा प्रयत्न असेल. यासाठी जर्मनीनेही प्रभावी डावपेच आखले आहेत. आता ब्राझीलवर मात करून अंतिम फेरी गाठण्याचा जर्मनीचा प्रयत्न असेल. थॉमस म्युल्लरही सध्या चांगलाच फॉर्मात आहे. ब्राझीलविरुद्ध चमत्कारिक खेळी करून जर्मनीला अंतिम फेरीचे तिकीट मिळवून देण्यावर म्युल्लरचा अधिक भर असेल. तसेच जर्मनीकडून डिंफेडर जेरोम बोटेंग, फिलीप लामदेखील ब्राझीलविरुद्ध उल्लेखनीय कामगिरीसाठी सज्ज झाले आहे.
नेमारच्या जागी विलियन
जर्मनीविरुद्धच्या उपांत्य लढतीत जखमी नेमारच्या जागी मिडफील्डर विलियनला खेळण्याची संधी मिळू शकते, अशी शक्यता ब्राझीलचे प्रशिक्षक लुईस फेलिप स्कॉलरी यांनी सोमवारी संघाच्या सराव सत्रादरम्यान वर्तवली आहे. विश्वचषकापूर्वी ब्राझीलच्या संभाव्य संघाचा स्थानिक क्लबविरुद्ध सामना झाला होता. त्यात विलियनला नेमारच्या जागी खेळवण्यात आले होते. स्कॉलरी यांनी नेमारला पर्याय म्हणून रामिरेज, बर्नांड आणि हर्नानेस यांच्याकडूनही सराव करून घेतला आहे. स्थानिक क्लबविरुद्ध खेळताना ब्राझीलने या तिघांच्या गोलच्या बळावर 3-0 ने विजय मिळवला.
सिल्वाच्या अनुपस्थितीचा धोका
ब्राझीलची अंतिम फेरीतील प्रवेशाची वाट अधिकच खडतर झाली आहे. नेमारपाठोपाठ आता कर्णधार थियागो सिल्वाही यलो कार्डमुळे जर्मनीविरुद्धच्या उपांत्य सामन्याला मुकणार आहे. त्यामुळे ब्राझीलची बाजू अधिकच दुबळी झाली आहे.
64 वर्षांनंतर फायनलमध्ये!
यजमान ब्राझीलला तब्बल 64 वर्षांनंतर प्रथमच घरच्या मैदानावर फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. यापूर्वी, हे यश 1950 मध्ये मिळाले होते. या सामन्यात ब्राझीलला पाहुण्या उरुग्वेने पराभूत केले होते.
ब्राझील संघ अडचणीत!
स्टार स्ट्रायकर नेमारच्या दुखापतीचा मोठा फटका यजमान ब्राझील संघाला उपांत्य लढतीत बसण्याची शक्यता आहे. नुकत्याच उपांत्यपूर्व लढतीत त्याला गंभीर दुखापत झाली. याच दुखापतीमुळे नेमारला आता दीर्घ विश्रांती देण्यात आली.
जर्मनी काढणार वचपा!
यापूर्वी, ब्राझीलने गत 2002 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये जर्मनीला पराभूत केले होते. आता याच पराभवाची ब्राझीलला परतफेड करण्याची मोठी संधी जर्मनीला आहे. यासाठीच जर्मनी संघ सज्ज झाला आहे.
पुढे वाचा...जर्मनीवर ब्लॅक मॅजिक!