रिओ दी जानेरिओ - जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या कोलंबियाने ऐतिहासिक विजयाची नोंद करताना विश्वचषक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. फॉर्मात असलेल्या जेम्स रॉड्रिग्जने (28, 50 मि.) केलेल्या गोलच्या बळावर कोलंबियाने उरुग्वेवर 2-0 ने एकतर्फी विजय मिळवला.
कोलंबियाने सुरूवातीपासूनच सामन्यात दबदबा निर्माण केला होता. रॉड्रिग्जने 28 व्या मिनिटाला गोलचे खाते उघडले आणि कोलंबियाला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. दरम्यान, उरुग्वेच्या खेळाडूंनी बरेचदा कोलंबियाच्या बचावफळीला भेदण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यात यश मिळू शकले नाही.
पहिल्या हाफमध्ये शानदार प्रदर्शन करणार्या रॉड्रिग्जने दुसर्या हाफमध्येही तो कायम ठेवला. सामन्याच्या 50 व्या मिनिटाला त्याने पुन्हा एकदा उरुग्वेच्या गोलपोस्टवर हल्ला चढवला आणि कोलंबियाला 2-0 ची विजयी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर उरुग्वेनी सामन्यात परतण्याचा अनेकदा प्रयत्न केला. परंतु, त्यांचे प्रत्येक प्रयत्न निष्फळ ठरले. दरम्यान, कोलंबियाच्या प्रशिक्षकाने स्टार खेळाडू रॉड्रिग्जला मैदानाबाहेर बसवले. दुसरीकडे, उरुग्वेला त्यांचा बहूचर्चित खेळाडू सुआरेझची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. त्याच्या अनुपस्थितीमुळे मध्यक्रमातील ताळमेळ ढासळला होता. या पुढील फेरीत कोलंबियाचा सामना तगड्या ब्राझीलशी 4 जुलै रोजी होणार आहे.