आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

110 वर्षांत फिफामध्ये झाले अनेक आमूलाग्र बदल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंतरराष्ट्रीय फुटबॉल फेडरेशन (फिफा) ची 110 वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली. सुरुवातीला फक्त आठ देशांदरम्यान आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करणे इतकेच फिफाचे काम होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. सध्या 209 देश फिफाचे सदस्य असून त्याच्या कमाईत अब्जावधी डॉलर्सची वाढ झाली आहे. फिफा आता इतकी मोठी संस्था बनली आहे की अनेक लहान राष्ट्रे चक्क फिफावरच अवलंबून आहेत. सध्याच्या विकासात्मक बाबींनुसार फिफा एक राष्ट्र असते, अशी आपण कल्पना केली तर त्याची स्थिती नेमकी कशी असू शकेल, याविषयीचा हा एक अहवाल...
फिफाला ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकातून सुमारे 4.5 अब्ज डॉलर्सची कमाई होण्याची शक्यता आहे.

फिफाला माल्टा देशापेक्षा जास्त उत्पन्न होणार
फिफाला विश्वचषकातून 4.5 अब्ज डॉलर्सची कमाई होण्याची शक्यता आहे. ही कमाई माल्टा या राष्ट्राच्या 2012 आर्थिक वर्षातील वार्षिक उत्पनापेक्षा एक अब्ज डॉलर्सने अधिक आहे. फिफाला या उत्पन्नासोबतच यजमान देशाकडून कर सवलतही मिळत असते. या मुळे ब्राझीलला सुमारे 248.7 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होऊ शकते.

सोमाली सरकारपेक्षा कमी महिला पदाधिकारी
110 वर्षे जुन्या फिफाच्या प्रशासकीय मंडळात मागच्या वर्षी प्रथमच एका महिला पदाधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली. लिडिया सेकेरा असे या महिलेचे नाव आहे. सोमालियाच्या सरकारमध्ये यापेक्षा जास्त म्हणजेच 25 मंत्र्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. ओमान आणि बांगलादेश सरकारमध्येसुद्धा प्रत्येकी दोनच महिला सामील आहेत.

अध्यक्षांचा पुतीनपेक्षाही जास्त दीर्घ कार्यकाळ
फिफा अध्यक्ष सॅप्प ब्लॅटर यांनी अध्यक्षपद उपभोगण्याच्या बाबतीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (62 वर्षे) आणि अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष आब्देल अजीज बाऊटेफ्लिका (77 वर्षे) यांना मागे टाकले आहे. ब्लॅटर 8 जून 1988 रोजी फिफा अध्यक्ष बनले. पुतीन 2000 मध्ये तर आब्देल अजीज 1999 मध्ये राष्ट्राध्यक्ष बनले होते. तिघेही सध्या आपापल्या पदांवर कार्यरत आहेत. मात्र, ब्लॅटर त्यांच्या तुलनेत पुढे आहेत. पुढच्या वर्षीसुद्धा ब्लॅटर हेच फिफाच्या अध्यक्षपदी विराजमान असतील.

बर्लुस्कोनींपेक्षा जास्त लाचखोरीचे आरोप
आतापर्यंत राजकीय नेत्यांवरच लाचखोरी, भ्रष्टाचाराचे आरोप लावले जायचे. मात्र, आता फिफासुद्धा या श्रेणीत आला आहे. फिफाचे वरिष्ठ पदाधिकारी बिन हमाम यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी कतारला विश्वचषकाचे यजमानपद मिळवून देण्यासाठी फिफा अधिकार्‍यांना 5 दशलक्ष डॉलरची लाच दिली. त्यांनी याबाबतीत इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांना मागे टाकले आहे. बर्लुस्कोनी यांनी 2006 मध्ये एका इटालियन सिनेटरला आपल्या पार्टीत येण्यासाठी 4 दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप आहे.

ऑस्ट्रेलियापेक्षा तीन वर्षांनी लहान फिफा : कॉमनवेल्थ ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना 1 जानेवारी 1901 रोजी झाली. 6 उपखंड मिळून ऑस्ट्रेलियाची निर्मिती झाली होती. त्यानंतर तीन वर्षांनी अर्थात 21 मे 1904 रोजी फिफाची स्थापना झाली.

संयुक्त राष्ट्रापेक्षाही जास्त सदस्य : फिफा स्वत:ला ‘युनायटेड नेशन्स ऑफ फुटबॉल’ असे संबोधतो. सध्या फिफात 209 देश सदस्य असून संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांची संख्या 192 इतकीच आहे. संयुक्त राष्ट्रातील व्हॅटिकन सिटी व मोनॅको वगळता अन्य सर्व देश फिफाचे सदस्य आहेत.