पोटरे एलेग्रे - तीन वेळचा माजी चॅम्पियन जर्मनी संघाने फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. जबरदस्त फॉर्मात असलेल्या जर्मनीने मध्यरात्री प्री-क्वार्टर फायनलमध्ये अल्जेरियाचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. यासह या संघाने अंतिम आठमध्ये धडक मारली.
आंद्रे शैरेल (90+2 मि.) आणि मेसिक ओझिल (120 मि.) यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर जर्मनीने सामना जिंकला. दरम्यान, जाबोऊने (120+2 मि.) अल्जेरियासाठी केलेला गोल व्यर्थ ठरला. तसेच अल्जेरियाचा हा सामन्यातील एकमेव गोल ठरला. निर्धारित वेळेपर्यंत ही रंगतदार लढत शून्य गोलने बरोबरीत राहिली होती. त्यानंतर अतिरिक्त वेळेत आंद्रे आणि ओझिलने बाजी मारून जर्मनीला विजय मिळवून दिला.
अल्जेरियाविरुद्ध लढतीत जर्मनीच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळीवर अधिक भर दिला. दरम्यान, प्रतिस्पर्धी अल्जेरियानेही सुरेख बचावात्मक खेळी करत जर्मनीच्या खेळाडूंचा गोलचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. फुटबॉलच्या विश्वातील बलाढय़ संघ म्हणून ओळखल्या जाणार्या जर्मनीने नावलौकिकास साजेशी खेळी करत सामन्यावर पकड केली. तसेच सामन्यातील विजयही निश्चित केला. ओझिलने 25 व्या मिनिटाला, थॉमस म्युल्लरने 35 व्या मिनिटाला आणि क्रुजने 44 व्या मिनिटाला गोल करण्याची संधी हुकवली. तसेच अल्जेरियाच्या मिडफील्डर मुस्तफाने 41 व्या मिनिटाला गोलपोस्टवर हल्ला केला. मात्र, जर्मनीच्या गोलरक्षकाने हा प्रयत्न उधळून लावला.
म्युल्लरनेही 80 ते 90 व्या मिनिटांदरम्यान, अनेक संधी दवडल्या. मात्र, निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघांना समाधानकारक कामगिरी करताना गोलचे खाते उघडता आले नाही. परिणामी अतिरिक्त वेळेत 92 व्या मिनिटाला आंद्रेने जर्मनीकडून पहिला गोल केला. त्यापाठोपाठ 119 व्या मिनिटाला ओझिलने गोल करून जर्मनीच्या आघाडीला 2-0 ने मजबूत केले. त्यापाठोपाठ अल्जेरियाच्या जाबोऊने 120+1 व्या मिनिटाला गोल केला.
फ्रान्सचे तगडे आव्हान
जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानी असलेल्या जर्मनीसमोर 4 जुलै रोजी फ्रान्सचे तगडे आव्हान असेल. फ्रान्सने सोमवारी नायजेरियाविरुद्ध सामन्यात 2-0 अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवला. यासह फ्रान्सने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यामुळे आता फ्रान्स आणि तीन वेळचा चॅम्पियन जर्मनी यांच्यात रोमहर्षक सामना होण्याची शक्यता आहे.
जखमी नेमार खेळणार!
शुक्रवारी ब्राझील व कोलंबिया दरम्यान खेळल्या जाणार्या उपांत्यपूर्व लढतीत ब्राझीलचा जखमी फुटबॉलपटू नेमार खेळण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे सध्या त्याला विर्शांती देण्यात आली आहे. सामन्याला अद्याप दोन दिवस बाकी असून नेमार सराव करण्याची शक्यता आहे.
दिव्य मराठी फुटबॉल चॅम्पियनशिप कॉन्टेस्टचे विजेते
नितीन संगम (अमरावती), उमेश गाडगे (अकोला), दत्ताद्रेया (सोलापूर), आकाश राजेंद्र तिवारी (जालना), बाळकृष्ण कोंडा (सोलापूर), अमोल सुतकर काथार (औरंगाबाद), पुरुषोत्तम गोदूर (सोलापूर). सर्व विजेत्यांना लवकरच बक्षिसांसंबंधीची माहिती दूरध्वनीवरून देण्यात येईल.
(फोटो - गोल करताना जर्मनीचा खेळाडू ओझिल.)