फोर्टलेझा - पाच वेळच्या चॅम्पियन ब्राझील संघाने फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. यजमान ब्राझील संघाने घरच्या मैदानावर उपांत्यपूर्व लढतीत कोलंबियाचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. या विजयासह यजमानांनी 11 व्या वेळेस वर्ल्डकपची उपांत्य फेरी गाठली. याच विजयामुळे आता ब्राझील संघ वर्ल्डकपच्या किताबापासून अवघ्या दोन पावलांवर येऊन ठेपला आहे.
कर्णधार थियागो सिल्वा (7 मि.) आणि डेव्हिड लुईज (89 मि.) यांनी केलेल्या गोलच्या बळावर ब्राझीलने रंगतदार सामना जिंकला. कोलंबियासाठी जेम्स रॉड्रिग्जने 80 व्या मिनिटाला गोल केला. कोलंबियाचा हा एकमेव गोल ठरला. यासह कोलंबियाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
ब्राझील संघाने वर्ल्डकपमधील आपली विजयी मोहीम अबाधित ठेवण्यासाठी दमदार सुरुवात केली. त्यामुळेच कोलंबिया संघाने आखलेले डावपेच सामन्यात सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
पहिला गोल कर्णधाराच्या नावे : सामन्यातील पहिला गोल ब्राझीलचा कर्णधार थियागो सिल्वाच्या नावे राहिला. नेमारने पाठवलेल्या चेंडूला पेनल्टी बॉक्सजवळ उभ्या असलेल्या सिल्वाने उत्कृष्टरीत्या गोलपोस्टमध्ये पाठवले. यासह सातव्या मिनिटाला ब्राझीलने लढतीत 1-0 ने आघाडी मिळवली. या गोलच्या बळावर यजमानांनी मध्यंतरापर्यंतचा आपला दबदबा कायम ठेवला.
लुईजने मिळवून दिली आघाडी : डिफेंडर डेव्हिड लुईजने लढतीत बाझीलला 2-0 ने आघाडी मिळवून दिली. त्याने सामन्याच्या 69 व्या मिनिटाला सामन्यातील दुसरा गोल केला.