आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अामरेंचा राजीनामा; अन्य सदस्य खुर्चीला चिकटून! लोढा समिती शिफारशींचा मान राखून घेतला निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारताचा माजी कसोटीपटू प्रवीण अामरे यांनी आज मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दिल्ली डेअरडेव्हिल्स या फ्रँचायझीच्या गुणवत्ता शोध मोहिमेचा प्रमुख म्हणून यंदा अामरे यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे लोढा समितीच्या शिफारशींचा आदर करून आपण समितीवरून पायउतार होत असल्याचे अामरे यांनी म्हटले आहे.  प्रत्यक्षात मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अनेक सदस्य दोन संघटना, सरकारी नोकरी किंवा महत्त्वाच्या अन्य समित्यांवर काम करीत असूनही कार्यकारीणीवर आणि अनेक पदांना चिकटून आहेत. असे असताना प्रवीण अामरे यांच्यासाठी हा वेगळा न्याय का असा सवाल मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य उपस्थित करीत आहेत.


असे कळते की, गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रवीण अामरे यांनी एमसीए सोडून जावे यासाठी दबाव आणला जात होता. अजिंक्य रहाणे, रॉबीन उथप्पा, सुरेश रैना या भारतीय संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी प्रवीण आमरे यांना आडकाठी आणली जात होती. वांद्रे-कुर्ला संकुलातील शरद पवार अॅकॅडमीमधील इनडोअर प्रशिक्षण सुविधा यांचा वापर करण्यापासून रोखण्यात येत होते. त्यातच बीसीसीआयकडे तक्रार करून आयपीएल फ्रँचायझीसाठी काम करतो असे कळवून आमरे यांच्यावर पद सोडण्यासाठी दबाव आणला जात होता, एवढेच नव्हे तर अलिकडे आमरे यांना कार्यकारीणीच्या बैठकीलाही उपस्थित राहू नये यासाठी अप्रत्यक्ष दबाव आणला जात होता.


शेवटी या दडपणाला कंटाळून मुंबई क्रिकेटची विनामूल्य सेवा करण्याचे हाती घेतलेले कार्य आमरे यांना नाईलाजाने सोडावे लागले. मुंबईच्या क्रिकेट विकास समितीवरही ते अध्यक्ष म्हणून काम करीत होते. ते पदही त्यांना सोडावे लागणार आहे.


आयपीएल लिलाव प्रक्रीयेदरम्यान ते उपस्थितही होते. अन्य दोन सदस्य सरकारी सेवेत आहेत. कार्यकारीणीचा कार्यकाळ संपून देखील हे सदस्य अजूनही कामकाज पहात आहेत.

 

वेगवेगळा न्याय  
आमरे यांना एक न्याय आणि अन्य सदस्यांना वेगळा असे चित्र सध्या मुंबई क्रिकेट असो. मध्ये आहे. विद्यमान अध्यक्ष आशिष शेलार हे स्वत: आमदार आहेत.  मुंबई विभागाचे अध्यक्षही आहेत. उपाध्यक्ष विनोद देशपांडे शरद पवार इनडोअर अॅकॅडमीचे कामकाज पहात आहेत; त्यांच्याविरुद्धही तक्रारी आहेत. चंद्रकांत पंडित यांना पदावरून हुसकावून लावण्यास ते कारणीभूत ठरले अशीही चर्चा मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात आहे. दुसरे उपाध्यक्ष पंकज ठाकूर हे अन्यत्र पदाधिकारी आहेत. सचिव  शेट्टी  फुटबॉल संघटनेवर व आयपीएल गर्व्हनिंग कौंसिलचेही सदस्य आहेत.

 

 

चाैकशी करताे : शेलार 
प्रवीण अामरेंसाठीच वेगळा न्याय का? याबाबत एमसीएचे अध्यक्ष आशिष शेलार यांना विचारले असता त्यांनी चौकशी करून सांगतो एवढेच उत्तर दिले. देशातील अन्य क्रिकेट संघटनांना लोढा शिफारशींचा आदर करून त्या स्वीकारल्या आहेत. मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशन अजूनही सर्वोच्च न्यायालयाच्या त्या आदेशांच्या अंमलबजावणी पासून दूर पळत आहे. अामरे यांनी स्वत:हून  दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार व दिलीप वेंगसरकर संघटनेवरील  पद सोडले होते. 

बातम्या आणखी आहेत...