औरंगाबाद - महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने अध्यक्ष अजय शिर्के यांनी चालू हंगामातील रणजी करंडकसाठी महाराष्ट्राचा १५ सदस्यीय संघ मंगळवारी जाहीर केला. संघाचे नेतृत्व भारतीय खेळाडू केदार जाधवच्या खांद्यावर देण्यात आले आहे. गतवर्षीच्या संघातील यंदा केवळ यष्टिरक्षक विशांत माेरेला संधी देऊन एकमेव बदल केला आहे. गतवर्षी जबरदस्त फाॅर्मात असलेल्या अंकित बावणेच्या फलंदाजीच्या बळावर महाराष्ट्राने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. यंदा अंकितसह केदार जाधव, स्वप्निल गुगळे, चिराग खुराणा, हर्षद खडीवाले आणि गोलंदाज श्रीकांत मुंढे यांच्याकडून यंदाच्या सत्रात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. महाराष्ट्राचा पहिला सामना झारखंडविरुद्ध ६ ते ९ ऑक्टोबरदरम्यान दिल्लीच्या रेल्वे मैदानावर खेळवला जाईल.
संघ पुढीलप्रमाणे : केदार जाधव कर्णधार, हर्षद खडीवाले, स्वप्निल गुगळे, राहुल त्रिपाठी, अंकित बावणे, नौशाद शेख, ऋतुराज गायकवाड, विशांत मोरे, चिराग खुराणा, सत्यजित बच्छाव, श्रीकांत मुंढे, डॉमिनिक मुथ्थास्वामी, अनुपम संकलेचा, शुभम कोठारी, मुर्तुझा ट्रंकवाला.