आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्विन नंबर वन गोलंदाज, अजिंक्य रहाणे टॉप-१० फलंदाजांमध्ये सामील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंदूर येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीनंतर आयसीसीने क्रमवारी जाहीर केली आहे. इंदूर कसोटीत १३ बळी घेणारा भारताचा ऑफस्पिनर आर. अश्विन पुन्हा नंबर वन गोलंदाज बनला आहे. क्रमवारीत त्याने अव्वलस्थान गाठले. इतकेच नव्हे, तर त्या कसोटीतून त्याला ४१ रेटिंग गुणांचा फायदा झाला. ९०० रेटिंग गुण पार करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे. अश्विनशिवाय २१ गोलंदाजांनी ९०० रेटिंग गुण मिळवले होते. ९३२ गुणांसह इंग्लंडचा सिडनी बर्न्स सर्वात पुढे आहे. इतके गुण त्यानंतर एकाही गोलंदाजाला मिळवता आलेले नाही.
इंदूर कसोटीच्या आधी अश्विन ८५९ गुणांसह तिसऱ्या स्थानी होता. मात्र, या कसोटीनंतर त्याने डेल स्टेनला अव्वल स्थानावरून हटवले. स्टेन आता दुसऱ्या तर जेम्स अँडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. रवींद्र जडेजाने या सामन्यात ४ गडी बाद केले. त्याच्या क्रमवारीत एका स्थानाने घसरण झाली. तो सातव्या स्थानी पोहोचला आहे. यामुळे पाकचा यासिर शहा पुन्हा सहाव्या क्रमांकावर आला आहे. स्टुअर्ट ब्रॉड चौथ्या, रंगना हेराथ पाचव्या स्थानी आहे. ट्रेंट बोल्ट टॉप-१० मधून बाहेर झाला आहे. तो ११ व्या स्थानी आहे. नील वॅग्नर नवव्या, तर फिलेंडर दहाव्या क्रमांकावर आले आहेत.
भारतीय गोलंदाज असे : टॉप-१० बाहेर मो. शमीला एका स्थानाचे नुकसान झाले. तो २४ व्या, तर भुवनेश्वर कुमार २ स्थानांच्या घसरणीसह २८ व्या स्थानी आहेत. ईशांत शर्मा २२ व्या, उमेश यादव ३१ व्या, तर अमित मिश्रा ३५ व्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलंडचा टीम साउथी १६ व्या, डग ब्रेसवेल ३७ व्या, मार्क क्रेग ४२ व्या, मिचेल सँटनर ५८ व्या, मॅट हेनरी ६८ व्या, तर जेम्स निशाम ७० व्या आणि जितेन पटेल ८० व्या स्थानी आहेत. न्यूझीलंडच्या खेळाडूंची क्रमवारीत घसरण झाली आहे.
अजिंक्य रहाणे टॉप-१० फलंदाजांमध्ये सामील
इंदूर कसाेटीत १८८ धावांची खेळी करणारा भारताचा अजिंक्य रहाणे टॉप-१० फलंदाजांत सामील झाला असून त्याने सहावे स्थान पटकावले. रहाणेला ५ स्थानांचा फायदा झाला. त्याच्या नावे ८२५ रेटिंग गुण आहेत. इंदुरात द्विशतक काढणारा कर्णधार कोहली, चेतेश्वर पुजारा यांचीही प्रगती झाली. कोहलीची चार स्थानांनी प्रगती झाली असून तो १६ व्या क्रमांकावर आहे. पुजारा एका स्थानाच्या प्रगतीसह १४ व्या क्रमांकावर आहे. मुरली विजयचे दोन स्थानांनी नुकसान झाले असून तो २३ व्या क्रमांकावर आहे. इंदुरात अर्धशतक काढणारा रोहित शर्मा एका स्थानाच्या प्रगतीसह ३७ व्या क्रमांकावर आहे. शिखर धवन ४४ व्या, वृद्धिमान साहा ५६ व्या, तर अश्विन ५० व्या स्थानी आहे. गंभीर ६८ व्या क्रमांकावर आहे. किवी कर्णधार या कसोटीत फ्लॉप ठरला. दोन स्थानांच्या नुकसानीसह तो पाचव्या क्रमांकावर घसरला.
फलंदाज : टाॅप-१०
१. स्टीव्हन स्मिथ ऑस्ट्रेलिया ९०६
२. जो. रुट इंग्लंड ८७८
३. हाशिम आमला द. आफ्रिका ८४७
४. युनूस खान पाकिस्तान ८४५
५. केन विल्यम्सन न्यूझीलंड ८४१
६. अजिंक्य रहाणे भारत ८२५
७. अॅडम वोग्स ऑस्ट्रेलिया ८०२
८. डिव्हिलर्स द. आफ्रिका ८०२
९. डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलिया ७७२
१०. अॅलेस्टर कुक इंग्लंड ७७०
गोलंदाज : टॉप-१०
१. अार. अश्विन भारत ९००
२. डेल स्टेन द. आफ्रिका ८७८
३. जेम्स अँडरसन इंग्लंड ८५९
४. स्टुअर्ट ब्रॉड इंग्लंड ८३६
५. रंगना हेराथ श्रीलंका ८३१
६. यासिर शहा पाकिस्तान ८०६
७. रवींद्र जडेजा भारत ८०५
८. मिशेल स्टार्क ऑस्ट्रेलिया ७९२
९. नील वॅग्नर न्यूझीलंड ७३१
१०. वेर्नेन फिलेंडर, द. आफ्रिका ७२३
अष्टपैलूंतही अश्विन नंबर वन
कसोटीत अष्टपैलूंच्या यादीतही अश्विन ४५१ गुणांसह अव्वलस्थानी आहे. रवींद्र जडेजाला एका स्थानाचा फायदा झाला. तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा सकिब-अल-हसन दुसऱ्या, इंग्लंडचा मोईन अली चौथ्या, तर ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क पाचव्या क्रमांकावर आहेत.
बातम्या आणखी आहेत...