दुबई- भारताचा ऑफस्पिनर आर. अश्विनची गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. झिम्बाब्वे-श्रीलंका कसोटीनंतर आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली. यात श्रीलंकेचा फिरकीपटू रंगना हेराथने अश्विनला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले. भारताचा डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा अव्वलस्थानी कायम आहे. जडेजाने ८९८ गुण, हेराथचे ८६६ गुण तर अश्विनचे ८६५ गुण आहेत.
झिम्बाब्वेविरुद्ध कसोटीत हेराथने सामन्यात १० गडी बाद केले होते. याचा त्याला फायदा झाला. हेराथ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचल्याने आता अव्वल दोन स्थानी डावखुरे फिरकीपटू विराजमान झाले आहेत. ३९ वर्षीय हेराथ कसोटीतील सर्वात यशस्वी डावखुरा फिरकीपटू आहे. त्याच्या नावे ८१ कसोटींत ३८४ बळी आहेत. हेझलवूड चौथ्या स्थानी आहे.