आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्विन म्हणाला 300 विकेटचा अतिरिक्त दबाव नाही, यासिरचे कसोटीत वेगवान १०० बळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - भारताच्या भूमीवर या सत्रात होणाऱ्या पुढच्या १० कसोटींत ३०० बळींचा टप्पा गाठण्याचे लक्ष्य ठरवून मी स्वत:ला अतिरिक्त दबावात अाणू इच्छित नाही, असे मत भारताचा स्टार ऑफस्पिनर आर. अश्विनने व्यक्त केले आहे. एका कार्यक्रमादरम्यान अश्विन म्हणाला, ‘सध्या मी कोणत्याच आकड्याचा किंवा लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या विचारात नाही. मला असा विचार करायची गरज नाही. सध्या मी ज्या स्थितीत आहे, त्याचा आनंद लुटत आहे,’ असेही त्याने नमूद केले.

अश्विनने आतापर्यंत ३९ कसोटींत २२० बळी घेतले आहेत. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध कसोटीतील तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने २७ बळी घेतले होते. तो सातव्यांदा मालिकावीराचा मानकरी ठरला होता. करिअरच्या सर्वात चांगल्या काळातून आपण जात असल्याचे या वेळी अश्विनने मान्य केले. आगामी इंग्लंडविरुद्ध मालिकेबाबत अश्विन म्हणाला, ‘इंग्लंडची टीम खूप मजबूत आणि चांगली आहे. त्यांना सहज घेता येणार नाही. त्या मालिकेसाठी मी खूप सराव करत आहे. इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी स्वत:ला फिट आणि फ्रेश ठेवण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेतून ब्रेक घेणे गरजेचे होते,’ असे त्याने म्हटले.

शेन वॉर्नकडून अश्विन, यासिरची स्तुती
फिरकीचा बादशहा ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्नने िट्वट करून भारताचा ऑफस्पिनर आर. अश्विन आणि पाकचा लेगस्पिनर यासिर शाह यांच्या आताच्या कामगिरीची स्तुती केली आहे. तुम्ही विदेशी भूमीवरही चमकदार प्रदर्शन कराल, असा विश्वास वॉर्नने व्यक्त केला.

अश्विन-यासिर एकदाच आले समोरासमोर
अश्विन आणि यासिर शाह मैदानावर आतापर्यंत फक्त एकदाच समोरासमोर आले आहेत. मागच्या वर्षी झालेल्या वर्ल्डकप सामन्यात दोघे समोरासमोर होते. त्या सामन्यात अश्विनला एक विकेट मिळाली तर यासिरला विकेट मिळू शकली नाही. भारत आणि पाकिस्तान या देशांच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावामुळे तसेच पाककडून दहशतवादाला सातत्याने मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे दोन्ही देशांत २००७ पासून एकही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. दरम्यान, २०११ मध्ये अश्विनने कसोटी पदार्पण केले, तर यासिरने दोन वर्षांपूर्वी कसोटीला सुरुवात केली.
बातम्या आणखी आहेत...