आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फलंदाजांनी कमावले; गोलंदाजांनी गमावले !, ऑस्ट्रेलिया 5 विकेटेसने विजयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्थ - टीम इंडियाच्या शानदार फलंदाजीनंतरसुद्धा आॅस्ट्रेलियाने पहिला वनडे ५ विकेटने जिंकला. भारताचा सलामीवीर रोहित शर्माने १३ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद १७१ धावांचा पाऊस पाडला. रोहित आणि कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी २०७ धावांची द्विशतकी भागीदारी करून भारताला ३०९ धावांचा आव्हानात्मक स्कोअर उभा करून दिला. मात्र, रोहित-कोहलीच्या खेळीवर स्टीव्हन स्मिथ-जॉर्ज बेलीची फलंदाजी वरचढ ठरली. स्मिथ-बेली यांनी २४२ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला ५ विकेटने विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने ४ चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्मिथने १४९, तर जॉर्ज बेलीने ११२ धावा काढून शतके ठोकली.
रोहित आणि विराट कोहलीने (९१) दुसऱ्या विकेटसाठी २०७ धावांची विक्रमी द्विशतकी भागीदारी करून भारताला ३ बाद ३०९ धावांचा स्कोअर उभा करून दिला. मात्र, गोलंदाजांच्या सुमार प्रदर्शनाने फलंदाजाच्या मेहनतीवर पाणी फेरले. ऑस्ट्रेलियाने ४९.२ षटकांत ५ विकेट गमावून ३१० धावा काढत सामना जिंकला.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने अवघ्या २१ धावांत २ विकेट गमावल्या होत्या. यानंतर स्मिथ आणि बेली यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३७.१ षटकांत २४२ धावांची जबरदस्त भागीदारी करून भारताचा स्कोअर छोटा ठरवला.

शानदार द्विशतकी भागीदारी
स्मिथने वनडे करिअरमध्ये सर्वश्रेष्ठ खेळी करताना १३५ चेंडूंत ११ चौकार, २ षटकारांसह १४९ धावा ठोकल्या. बेलीने १२० चेंडूंत ११२ धावा काढत ७ चौकार आणि २ षटकार मारले. स्मिथचे हे पाचवे, तर बेलीचे तिसरे वनडे शतक ठरले. या दोघांनी २४२ धावांची भागीदारी करून सामना भारताच्या हातून हिसकावला.

रोहितचे नववे वनडे शतक
तत्पूर्वी, भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा िनर्णय घेतला. सलामीवीर रोहित शर्माने कारकीर्दीतील नववे वनडे शतक ठोकले. त्याने विराटसोबत दुसऱ्या विकेटसाठी २०७ धावा जोडल्या. रोहितने १६३ चेंडूंत १३ चौकार आणि ७ षटकार मारताना ही खेळी केली. विराटने ९७ चेंडूंचा सामना करताना ९ चौकार आणि एका षटकारासह ९१ धावा काढल्या.

वनडेत दोन द्विशतकी भागीदारीचा विक्रम
भारताकडून रोहित शर्मा-विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी २०७ धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथ आणि जॉर्ज बेली यांनी २४२ धावांची भागीदारी केली. वनडे क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात दोन द्विशतकी भागीदारीचा हा नवा विक्रम आहे.

कोहलीचे शतक हुकले
विराटचे शतक अवघ्या ९ धावांनी हुकले. तो ९१ धावांवर बाद झाला. षटकार मारण्याच्या नादात त्याने जेम्स फॉकनरच्या गोलंदाजीवर अॅरोन फिंचच्या हाती झेलबाद झाला. यानंतर धोनीने धावगती वाढवताना १३ चेंडूंत १ षटकार, १ चौकार मारून १८ धावांचे योगदान दिले.

धोनीची आक्रमक फलंदाजी
धोनीने रोहितसोबत तिसऱ्या विकेटसाठी ३.५ षटकांत झटपट खेळी करताना ४३ धावांची महत्त्वूपर्ण भागीदारी केली. या सामन्यात २८ वर्षीय रोहितने १५० धावा पूर्ण करण्यापूर्वी षटकार खेचून ऑस्ट्रेलियाविरुद्ध १००० धावा पूर्ण केल्या. रोहितने ६३ चेंडूंत ५०, १२२ चेंडूंत १००, १५५ चेंडूंत १५० धावा काढल्या. पर्थच्या मैदानावर शतक ठोकणारा तो पहिला भारतीय ठरला.