आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅडिलेड कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली, न्यूझीलंडवर ३ विकेटने निसटता विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड ; गुलाबी चेंडूने खेळवण्यात आलेली इतिहासातील पहिली डे-नाइट कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली. मालिकेतील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ३ विकेटने निसटता विजय मिळवला.
न्यूझीलंडने पहिल्या डावात २०२ धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २२४ धावा काढून पहिल्या डावात २२ धावांची आघाडी घेतली. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात २०८ धावा काढून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १८७ धावांचे लक्ष्य दिले. गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने ५१ षटकांत ७ बाद १८७ धावा काढून ३ विकेटने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली.

कालच्या ५ बाद ११६ वरून पुढे खेळताना न्यूझीलंडचा डाव २०८ धावांवर आटोपला. न्यूझीलंडकडून कालचा नाबाद फलंदाज सँटनरने संघाकडून सर्वाधिक ४५ धावांचे योगदान दिले. वॉटलिंग ७ धावा काढून बाद झाला. तळाचा फलंदाज मार्क क्रेगने १५ धावा जोडल्या. डग ब्रेसवेलने नाबाद २७ धावा काढून न्यूझीलंडला दोनशेचा टप्पा गाठून दिला. टीम साऊथीने १३ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने ७० धावांत ६ विकेट घेतल्या. मिशेल मार्शने तिघांना टिपले.

शॉन मार्शची झुंज
विजयासाठी आवश्यक असलेल्या १८७ धावांचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियन टीम संकटात सापडली होती. सलामीवीर जे. बर्न्स ११ धावा तर कर्णधार स्टीव्हन स्मिथ १४ धावा काढून बाद झाले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ३७ चेंडूंत ३५ धावा, तर वोग्सने ४५ चेंडूंत २८ धावा काढल्या. ऑस्ट्रेलियन टीम ४ बाद ११६ अशी संकटात सापडली होती. यानंतर शॉन मार्शने ११७ चेंडूंत झुंजार खेळी करीत ४९ धावा काढल्या. मिशेल मार्शने २८, पीटर नेव्हिलने १० धावांचे योगदान दिले. पीटर सिडलने नाबाद ९ धावा काढून विजयश्री मिळवून दिली.