आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 बळी घेणारे बी.अरुण गोलंदाजी कोच, संजय बांगर सहायक कोच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पसंत रवी शास्त्री टीम इंडियाचे नवे कोच बनले आणि आता शास्त्रींची पसंत असलेले भरत अरुण यांना भारतीय संघाचे गोलंदाजी कोच म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अरुणसह संजय बांगर यांना सहायक प्रशिक्षक बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) भरत अरुण यांना गोलंदाजी कोच बनवण्याची शिफारस केली होती. याआधी शास्त्री यांनी बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यासोबत सोमवारी झालेल्या बैठकीतही अरुण यांच्या नावाची शिफारस केली होती. बीसीसीआयने जेव्हा जहीर खानला गोलंदाजी कोच आणि राहुल द्रविडला विदेश दौऱ्यासाठी फलंदाजी कोच म्हणून नियुक्त केले होते, ते शास्त्री यांना पटले नाही. त्यांनी बीसीसीआयकडे अापला आक्षेप नोंदवला होता.
  
गोलंदाजी कोचसाठी जहीर आणि अरुण यांची कामगिरी पााहिली तर रंजक माहिती समोर येते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रदर्शनाच्या हिशेबाने भरत अरुण जहीर खानच्या तुलनेत कुठेच मापात बसत नाहीत. जहीरने ९२ कसोटींत ३११ विकेट तर २०० वनडेत २८२ विकेट घेतल्या आहेत. शिवाय १७ टी-२० सामन्यांत १७ बळीही त्याच्या नावे आहेत. त्याच्या नावे एकूण ६१० आंतरराष्ट्रीय विकेट आहेत. 

दुसरीकडे अरुण यांनी दोन कसोटींत ४ विकेट घेतल्या तर चार वनडेत एक विकेट घेतली आहे. त्यांच्या नावे एकूण ५ आंतरराष्ट्रीय विकेट आहेत.  जहीरकडेे त्याच्यापेक्षा ६०५ विकेट अधिक आहेत.

अंडर-१९ च्या दिवसांत शास्त्री, अरुण होते सोबत 
अरुण आणि शास्त्री अंडर-१९ संघाचे एकमेकांचे सहकारी होते. शास्त्री टीम इंडियाचे संचालक होते तेव्हासुद्धा अरुण भारतीय संघाचे गोलंदाजी कोच होते. हा निर्णय शास्त्री आणि बीसीसीआयच्या चारसदस्यीय समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याचा अर्थ शास्त्री आपल्या त्याच सपोर्ट स्टाफसोबत काम करतील, जे आधी संचालक असताना त्यांच्यासोबत होते. या स्टाफमध्ये क्षेत्ररक्षण कोच आर. श्रीधरचाही समावेश करण्यात आला. भारताच्या सपोर्ट स्टाफची २०१९ च्या विश्वचषकापर्यंत दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.  

सल्लागार म्हणून द्रविड, जहीर कायम  
शास्त्री यांनी सांगितले की, भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविड आणि वेगवान गोलंदाज जहीर खान सल्लागार म्हणून कायम राहतील. त्यांनी म्हटले, ‘मी या दोन्ही खेळाडूंसोबत तीन-चार दिवसांपूर्वीच चर्चा  केली होती. ते दोघेही याच्याशी सहमत आहेत. दोघे उत्तम क्रिकेटपटू होते. त्यांचा सल्ला आमच्यासाठी अत्यंत मोलाचा असेल.’ एकदा ते पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आमच्यासोबत सल्लागार म्हणून सामील होतील. याप्रकरणी आता कसलाच वाद नाही, असेही त्यांनी म्हटले.  

आयपीएल, टीपीएलमध्ये प्रशिक्षक आहेत भरत अरुण
अरुण यांची गोलंदाजी कोच म्हणून नियुक्ती झाली असताना दुहेरी हिताचा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. त्यांना आणि इतर सपोर्ट स्टाफला दुहेरी हिताचा विषय आधीच सोडवावा लागेल, अशी ताकीद प्रशासकीय समितीने आधीच िदली होती. अरुण मागच्या सत्रात रॉयल चॅलेंजर्सचे गोलंदाजी कोच होते. ते तामिळनाडू प्रीमियर लीगमध्येसुद्धा एका संघाचे कोच आहेत. विशेष म्हणजे राहुल द्रविडची जेव्हा भारत अ  आणि अंडर-१९ संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली तेव्हा त्याला आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कोचचे पद सोडावे लागले होते. 

मंडळाच्या समितीने शास्त्रींसह केली घोषणा
बीसीसीआय समितीमध्ये मंडळाचे प्रभारी अध्यक्ष सी.के.खन्ना, प्रभारी सचिव अमिताभ चौधरी आणि सीओएची सदस्या डायना इडुलजी यांचा समावेश आहे. द्रविड आणि जहीर यांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर गोंधळाची स्थिती झाल्याने ही समिती गठित झाली होती. जहीर, द्रविडचे नाव अजून फायनल नाही, असे त्या वेळी रॉय यांनी सांगितले होते. तेंडुलकर, गांगुली आणि लक्ष्मणच्या सल्लागार समितीने द्रविड, जहीरच्या नावाची शिफारस केली होती. आपल्या परवानगीशिवाय सल्लागार समितीने द्रविड, जहीरची निवड कशी काय केली, असे म्हणत प्रशासकीय समितीने नाराजी व्यक्त केली होती.