चितगाव- दमदार प्रदर्शन कायम ठेवत बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसाेटीच्या तिर्या दिवशी गुरुवारी ७८ धावांची आघाडी घेतली. बांगलादेशचा पहिला डाव दक्षिण आफ्रिकेने उभारलेल्या २४८ धावांच्या प्रत्युत्तरात ११६.१ षटकांत ३२६ धावांवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेने दुसर्या डावात एकही फलंदाज न गमावता ६१ धावा केल्या आहेत. बांगलादेशने बुधवारी चार बाद १७९ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मुशफिकूर रहीमने ६१ चेंडूंत पाच चौकार व एका षटकारासह २८ धावा केल्या. रहीम बांगलादेशच्या १९५ धावा असताना बाद झाला. यानंतर सकिब (४७) व लिटन दास (५०) यांनी सहाव्या गड्यासाठी ८२ धावांची भागीदारी केली. सकिब अर्धशतकापासून तीन धावा दूर असताना आॅफस्पिनर सायमन हार्मरने त्याला जेपी डुमिनीकरवी झेलबाद केले. सकिबने ११४ चेंडूंत चार चौकार ठोकून ४७ धावांची उपयोगी खेळी केली. स्टेनने ३ गडी बाद केले.