आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच दिवशी बांगलादेशच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला २४८ धावांत गुंडाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्तागोनग- दक्षिण आफ्रिकाविरुद्ध बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशी गोलंदाजांनी डरकाळी फोडली. या डरकाळीपुढे पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेसारखा बलाढ्य संघ अवघ्या २४८ धावांवर गडगडला. यात एका फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा दक्षिण आफ्रिकेचा निर्णय बांगलादेशी गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एल्गरने १११ चेंडूंत ३ चौकार खेचत ४७ धावा काढल्या. त्याने वान झयलसोबत पहिल्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. वानने ३४ धावा जोडल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या फाफ डु प्लेसिसने १२२ चेंडूंत ५ चौकार लगावत ४८ धावा काढल्या. डू प्लेसिस आणि एल्गरने दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी रचली. चौथ्या क्रमांकावर आलेला अनुभवी फलंदाज हाशिम आमला मोठी खेळी करू शकला नाही. तो १३ धावांवर असताना मुश्ताफिजुर रहेमानने त्याला यष्टिरक्षक लिटोन दासकरवी झेल बाद केले. पाचव्या क्रमांकावर आलेल्या टी. बावुमाने अर्धशतक झळकावले. त्याने १०८ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार खेचत ५४ धावा केल्या. त्याला मुश्ताफिजुर रहेमानने जुबेर हुसेनच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. जे.पी. ड्युमिनी आणि डी. कॉक भोपळाही फोडू शकले नाहीत. तळातील फलंदाज फिलेंडरने २४ धावा जोडल्या. हरमेरने ९ तर डेल स्टेन २ धावा काढून बाद झाले.

मुश्ताफिजूर रहेमान चमकला
बांगलादेशच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर लगाम लावला. मुश्ताफिजूर रहेमानने १७.४ षटकांत ३७ धावा देत ४ फलंदाजांना तंबूत पाठवले. जुबेर हुसेनीने ५३ धावांत ३ गडी बाद केले. सकिब अल हसन, महमुदुल्ला आणि तैजुल इस्लामने प्रत्येकी एक बळी घेतला.
बातम्या आणखी आहेत...