आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया कालवश, हृदयविकाराच्या झटक्याने निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (बीसीसीआय) जगमोहन दालमिया यांचे रविवारी रात्री ९.१५ वाजता निधन झाले. ते काही दिवसांपासून आजारी होते. ७५ वर्षीय दालमियांना गुरुवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्षपद भूषवलेल्या दालमियांची या वर्षी मार्चमध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते सक्रिय नव्हते. दालमियांची कोरोनरी अँजियोग्राफी करण्यात आली होती. हृदयात जमा झालेले रक्त काढण्यात आले, तरीही त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा झाली नव्हती, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. ३० मे १९४० रोजी दालमिया यांचा जन्म झाला होता. भारतीय क्रिकेटला व्यावसायिक स्वरूप देण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांनी १९९० च्या दशकात बीसीसीआयला जागतिक क्रिकेटमध्ये महाशक्ती बनवले होते.
खेळाच्या विकासासाठी झटणारा प्रशासक
दालमिया यांच्या निधनानंतर क्रिकेट जगतातून मान्यवरांनी श्रद्धांजली वाहून क्रिकेटचा उत्तम प्रशासक हरवल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. कोलकात्याच्या रुग्णालयात दालमिया यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला, माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, रोहित शर्मा, विराट कोहली, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दालमियांना श्रद्धांजली वाहिली.

जगमोहन दालमिया
जन्म : ३० मे १९४०, कोलकाता
टोपणनाव : डॉलरमिया. पैसा जोडणारा माणूस
अशी क्रिकेटविश्वात प्रतिमा.
-इंद्रजितसिंग बिंद्रा यांनी दालमिया यांना १९७९ ला क्रिकेटमध्ये आणले.
-भारतात १९९६ मध्ये वर्ल्डकप आयोजनात दालमियांचे मोठे योगदान.
-१९९७ मध्ये आयसीसीचे अध्यक्ष बनले.
-२००१ मध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान.
-२ मार्च २०१५ पासून पुन्हा बीसीसीआयचे अध्यक्ष.
मान्यवरांकडून श्रद्धांजली
भारताने नव्हे तर, जगाने एक चांगला प्रशासक गमावला. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो.
प्रणव मुखर्जी, राष्ट्रपती

दालमिया उत्तम प्रशासक होते. त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याचे बळ मिळो.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
दालमिया यांच्या निधनाने क्रिकेटचे अतोनात नुकसान झाले आहे. कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. राजीव शुक्ला, आयपीएलचे चेअरमन
ते उत्तम व्यक्ती होते. कोलकात्यात खेळताना अनेक वेळा त्यांच्याशी संपर्क आला. त्यांनी नेहमी खेळाडूंना बळ दिले, त्यांना मोठे केले. खेळाडूंसाठी ते झटले. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती मिळो. सचिन तेंडुलकर

त्यांनी नेहमी क्रिकेटपटूंना घडवण्यासाठी प्रयत्न केले. भारतीय क्रिकेटमध्ये त्यांनी क्रांती आणली. धोनी

दालमिया सर गेल्याची बातमी मनाला चटका लावून गेली. त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो. रोहित शर्मा

अध्यक्ष दालमियांच्या निधनाची बातमी धक्का देणारी आहे. भारतीय क्रिकेटचे मोठे नुकसान झाले आहे. सुरेश रैना