आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश रद्द करण्यासाठी बीसीसीआयचा अर्ज, आजची विशेष सर्वसाधारण सभा ठरेल निर्णायक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास चालढकल करणाऱ्या बीसीसीआयला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी समज दिल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबईत होणारी क्रिकेट बोर्डाची विशेष सर्वसाधारण सभा निर्णायक ठरणार आहे. लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारून त्यांचे बीसीसीआयच्या घटनेत रूपांतर करण्यावाचून त्यांच्यापुढे पर्यायच उरला नाही. दरम्यान, अखेरची धडपड म्हणून बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात बुधवारी नव्याने अर्ज दाखल करून बीसीसीआयच्या फेरविचार याचिकेवर सुनावणी होईपर्यंत १८ जुलैच्या आदेशाची अंमलबजावणी करू नये, असा नवा पवित्रा घेतला आहे.
बीसीसीआयचे सर्वसाधारण व्यवस्थापक रत्नाकर शेट्टी यांच्या स्वाक्षरीने दाखल करण्यात आलेल्या या अर्जाद्वारे बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयाकडे १८ जुलैच्या आदेशाची अंमलबजावणी त्वरित तहकूब करावी, अशी विनंती केली आहे. कायदेशीर उपाययोजना करण्यास पुरेसा अवधी बीसीसीआयने मागितला आहे. १८ जुलैच्या आदेशांची अंमलबजावणी झाल्यास क्रिकेटचे न भरून होणारे नुकसान होईल, अशी भीतीही या अर्जात व्यक्त करण्यात आली आहे. अर्जदाराने बाजू ऐकून न घेतल्यास पूर्वग्रहदूषित मतांमुळे होणारे नुकसान मोठे असेल. १८ जुलैच्या आदेशानंतर त्या निर्णयाविरुद्ध फेरविचार करणारी याचिका दाखल करताना बीसीसीआयने प्रमुख न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर यांच्या खंडपीठाचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित असल्याचे म्हटले होते. खंडपीठाने सत्य परिस्थितीची योग्य नोंद घेतली नाही, असेही बीसीसीआय म्हणाते.
बीसीसीआयच्या (२१ सप्टेंबर) वार्षिक सर्वसाधारण सभेत कोणताही निर्णय न घेण्याचे लोढा समितीने सूचित केले असतानाही बीसीसीआयने विविध समित्यांसह, निवड समिती व सचिवपदी अजय शिर्के यांची नियुक्ती केली. त्या सभेचे इतिवृत्तही लोढा समितीकडे पाठविण्यात आले नाही याबाबतही बीसीसीआयविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे.
बीसीसीआयच्या भूमिकेकडे लक्ष
बीसीसीआयच्या वानखेडे स्टेडियमवरील मुख्यालयात होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत लोढा समितीच्या शिफारशींनुसार घटनेत, नियमात बदल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा रोष आणि दृष्टिकोन पाहता बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि त्यांचे सहकारी कोणती भूमिका घेतात याकडे तमाम क्रिकेटविश्वाचे आणि लोढा समितीचे लक्ष लागले आहे.
बातम्या आणखी आहेत...