आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BCCI चे पुन्हा लोढा समितीकडे दुर्लक्ष, आयपीएल हक्कांच्या विक्रीसाठी प्रक्रिया सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून आयपीएल या आगामी आवृत्तीसाठी २०१८ ते २०२७ या कालावधीसाठीच्या प्रक्षेपण हक्कांसाठी निविदा मागवणाऱ्या बीसीसीआयने मंगळवारी बिनधास्तपणे त्या प्रक्रियेला जगातील ‘नामवंत कंपन्यांचा’ भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे जाहीर केले. आतापर्यंत साऱ्या गोष्टी गुलदस्त्यात ठेवून या प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या बीसीसीआयने लोढा समितीने आक्षेप घेतल्यानंतरही निविदा मागवण्याची प्रक्रिया जाहीर केली व ती पूर्णही केली.

बीसीसीआयच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला असताना, त्याला फारसे महत्त्व न देता दोन वर्षांनंतरच्या क्रिकेटसाठीची निविदा घाईगडबडीने मागवण्यापाठचा बीसीसीआयचा नेमका हेतू काय आहे, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. ॉ

टेलिव्हिजन, इंटरनेट आणि मोबाइल हक्कांच्या वितरणासाठी जगातील नामवंत अशा १८ कंपन्यांनी रस दाखवला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून ही निविदा प्रक्रिया नेटाने पुढे नेल्यास त्याचे परिणाम काय होतील ते आता सांगणे कठीण आहे.
बीसीसीआयने घाईगडबडीने ही प्रक्रिया पूर्ण करून, आपण कुणालाही घाबरत नाही, हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी निविदा भरणाऱ्या १८ कंपन्यांची नावेही जाहीर केली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आयपीएलसारख्या केवळ ‘मनोरंजन’ एवढीच किंमत असलेल्या क्रिकेटसाठी एवढा जीव का टाकता, असा सवाल याआधी केला होता.

चॅम्प्यिन्स ट्रॉफी की आयपीएल, असा सवाल व शंका उत्पन्न करणाऱ्या बीसीसीआयला, पारदर्शकता नसलेल्या क्रिकेटच्या आयोजनासाठी अट्टहास का, असाही सवाल विचारला होता. त्यानंतरही बीसीसीआयने आयपीएल या वादग्रस्त क्रिकेटवरील आपले प्रेम किंचितही कमी होऊ दिले नाही. अनेक वादांचे मूळ असलेल्या आयपीएलचा पहिला अध्याय २०१७ मध्ये संपेल.

निविदा भरणारे १८
स्टार इंडिया, अॅमेझॉन सेलर, फॉलोऑन इंटरॅक्टिव्ह, ताज टीव्ही, सोनी पिक्चर्स, टाइम्स इंटरनेट, सुपरस्पोर्ट््स इंटरनॅशनल, रिलायन्स जिओ, गल्फ डीटीएच, ग्रुप मीडिया इंडिया, बीइत आयपी, इकोनेट मीडिया, स्काय यूके, ईएसपीएन डिजिटल मीडिया, बीटीजी लीगल सर्व्हिसेस, बीटी पीएलसी, ट्विटर व फेसबुक..या १८ दिग्गज कंपन्यांनी आयपीएलसाठी निविदा भरल्याचे बीसीसीआयने मंगळवारी जाहीर केले.
बीसीसीआयची फेरविचार याचिका काेर्टाने फेटाळली
लोढा समितीने सुचवलेल्या शिफारशींवर देण्यात आलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी बीसीसीआयने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. क्रिकेट बोर्डाच्या प्रशासकीय कामकाजात पारदर्शीपणा यावा या दृष्टीने लोढा समितीने सुचवलेल्या सुधारणांना सर्वोच्च न्यायालयाने १८ जुलै २०१६ रोजी एका आदेशाद्वारे हिरवा कंदील दिला होता. त्या आदेशानंतर बीसीसीआयने फेरविचार याचिका दाखल केली होती. त्यातील त्रुटींबाबत न्यायालयाने कळवल्यानंतरही बीसीसीआयने बदल केले नाहीत. मंगळवारी दुपारी ही याचिकाच फेटाळण्यात आल्यामुळे बीसीसीआयपुढे लोढा समिती शिफारशी लागू करण्यावाचून आता पर्यायच उरला नाही.
बातम्या आणखी आहेत...