आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआय देणार टीम इंडियाला ‘धडे; शंभर सूचना असलेली आचारसंहिता जाहीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि माजी न्यायमूर्ती लोढा यांच्या संकल्पनेतील शिफारशींना अनुसरून आदर्श, पारदर्शी आणि स्वच्छ क्रिकेटचे स्वप्न साकारण्यासाठी, बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटूंसाठी शंभर सूचना असलेली आचारसंहिता शुक्रवारी जाहीर केली. तमाम भारतीय क्रिकेटपटूंसाठी यामध्ये काय खावे, काय प्यावे, कोणत्या वस्त्रांचा, आयुधांचा वापर करावा इथपासून निकाल निश्चितीच्या सापळ्यापासून कसे दूर राहावे, व्यावसायिकतेची कर्तव्ये आणि हक्क, कायद्याचे ज्ञान, स्वत:च्या पैशाचा वापर आणि विनिमय कसा करावा, प्रसिद्धी माध्यमांशी कसे वागावे आणि व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून आपली निष्ठा व कारकीर्दीदरम्यान आणि निवृत्तीनंतरची आपली लक्ष्ये यावर सविस्तर शाळा घेण्यात आली आहे. २१२ पानांच्या संहिता इंग्रजी भाषेतच असल्यामुळे क्रिकेटपटूंच्या या शाळेला खेळाडूंकडून कसा व किती प्रतिसाद मिळेल याबाबत सर्वत्र अनभिज्ञता आहे.  

या संहितेमधील काही महत्त्वाच्या शिफारशी
- पहिल्या विभागात शरीर विज्ञानाची जाणीव करून दिल्यानंतर कामगिरी उंचावण्यासाठी सराव कशा पद्धतीने, किती आणि कोणता करावा हे सांगण्यात आले आहे. झोप किती घ्यावी, झोपेचे महत्त्व व धूम्रपान, मद्यपान, उत्तेजक द्रव्य सेवनाचे दुष्परिणाम याबाबत खेळाडूंना सावध करण्यात आले आहे.
- क्रिकेटपटूंसाठीचा आदर्श आहार, आहारात प्रथिने, पाणी  ‘कार्बोहायड्रेट’ यांचे प्रमाण किती असावे. आहार सरावाआधी व नंतर तसेच सामन्याआधी व नंतरचा आहार याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
- दुखापती हे क्रिकेटपटूंच्या आयुष्याशी निगडित असलेले अविभाज्य अंग आहे. दुखापतींचे स्वरूप, त्या कशा टाळाव्यात, दुखापतीनंतर उपचारासाठी काय करावे, कोणते उपचार आहेत याबाबतची माहिती कुठे मिळेल, शस्त्रक्रियेनंतर पूर्वपदास येण्यास कालावधी किती लागेल.  
- क्रिकेटपटूंच्या कारकीर्दीत मानसिक सक्षमतेला कसे व किती महत्त्व आहे हे स्पष्ट करताना मनाची मशागत कशी व मनाला कशी विश्रांती घ्यावी हेही सांगण्यात आले आहे.

सज्ञान करण्याचा प्रयत्न
क्रिकेटपटूंना प्रत्येक व्यावसाियक करारातील नियम, अटींचे ज्ञान आवश्यक आहे. एजंटचे महत्त्व, त्याच्याशी संबंध कसे असावेत, करारातील कायदेशीर व व्यावसायिक गोष्टींबाबत भूमिका कशी असावी याबाबतही खेळाडूंना सज्ञान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 
बातम्या आणखी आहेत...