आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीसीसीआयचे अध्यक्षपद डळमळीत : दालमियांचे आजारपण; पवारांकडून फील्डिंग !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा जवळ आली की देशातील क्रिकेट संघटकांच्या राजकारणाला खर्‍या अर्थाने रंगत येते. २९ सप्टेंबरच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्याचा नियम या वेळी तरी पाळला जाईल अशी शक्यता दिसत नाही. मात्र, विद्यमान अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या आजारपणाचा आधार घेऊन बीसीसीआय अध्यक्षांच्या खुर्चीत बसण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्यात यंदा अधिक रस दाखवणार्‍या शरद पवार यांनी आपले संख्याबळ चाचपण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे. कोलकाता येथील कार्यकारिणीच्या बैठकीला एक दिवस आधी जाण्याइतपत रस शरद पवारांनी दाखवला होता.

पुन्हा बीसीसीआयचे अध्यक्ष होण्याच्या पवारांच्या महत्त्वाकांक्षेला अरुण जेटली आणि अमित शहा या भाजपच्या धुरीणांनी खतपाणी घालण्याची गरज लागणार आहे. शरद पवार पुन्हा बीसीसीआयचे अध्यक्ष होण्यासाठी त्यांना अध्यक्षांची खुर्ची रिक्त करून घेणे आवश्यक आहे. बीसीसीआयच्या घटनेनुसार निर्धारित काळाच्या पूर्वी कोणतेही पद रिक्त करायचे असल्यास त्या पदाधिकार्‍याने स्वत: राजीनामा देणे आवश्यक आहे. याचाच अर्थ, दालमिया यांनी स्वत:हून पद सोडले तरच शरद पवारांना अध्यक्ष होता येईल.

गत निवडणुकीनंतर एन. श्रीनिवासन यांनी स्वत:हून पवारांकडे मदतीची याचना केली होती. मात्र, त्या वेळी शशांक मनाेहर आणि अन्य मंडळींनी पवारांना श्रीनिवासन यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, ती परिस्थिती सध्या बदललेली दिसत आहे. आता पवारांना श्रीनिवासन यांच्या मदतीची गरज आहे, असे वाटते.

दालमियांची भूमिका महत्त्वाची
दालमिया यांची प्रकृती ठीक नसतानाही कार्यभार सांभाळण्याचा अट्टहास पाहिल्यानंतर ते स्वत: राजीनामा देऊन पद सोडतील, अशी शक्यता दिसत नाही. अशा परिस्थितीत फक्त एकच व्यक्ती दालमिया यांना पद सोडण्याचा आग्रह करू शकते. ती व्यक्ती म्हणजे अरुण जेटली. अरुण जेटली यांनी गेल्या निवडणुकीत पवारांना केलेली मदत श्रीनिवासन यांना रोखण्याइतपतच मर्यादित ठेवली होती. ही बाब लक्षात घेता, पवारांना अमित शहा यांची कुमक गरजेची ठरणार आहे.

ठाकूर यांचाही दावा
दुसरीकडे जगमोहन दालमिया अध्यक्षपदाच्या खुर्चीतून पायउतार झाल्यास तेथे स्थानापन्न होण्याचे मनसुबे अन्य पदाधिकारीही आखत आहेत. विद्यमान सचिव अनुराग ठाकूर हे स्वत: भाजपचे खासदार असून पक्षाचे, अमित शहांचे आणि प्रामुख्याने जेटलींचे आशीर्वाद त्यांना मिळू शकतात. दालमियांची खुर्ची प्राप्त झाल्यास ठाकूर यांच्या रिक्त खुर्चीवरही अनेकांचा डोळा आहे. मात्र, त्या खुर्चीत आपलेच आदेश पाळणारा सचिव बसवण्याइतपत ठाकूरही सुज्ञ राजकारणी आहेत.