आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा क्रिकेटपटूंच्या लीगला बीसीसीआयचा आक्षेप; बीसीसीआयचे प्रभारी सचिव चौधरींचे पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- येत्या १९ ते २९ सप्टेंबर दरम्यान दुबई येथे सुरू होणाऱ्या इंडियन ज्युनियर फ्लेअर लीग या भारतीय युवा क्रिकेटपटूंच्या स्पर्धेला, बीसीसीआयने नमनालाच खोडा घातला आहे. भारतीयांमधील सुप्त गुणवत्तेला वाव मिळावा आणि उपेक्षितांमधील दर्जेदार क्रिकेटपटूंना संधी मिळावी या हेतूने सुरू होत असलेल्या या स्पर्धेवर बीसीसीआयने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे गेले कित्येक महिने अथक परिश्रम करून केलेल्या पूर्वतयारीवर पाणी फेरले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी बीसीसीआयच्या सर्व संलग्न असोसिएशन आणि संघटनांना पत्र पाठवून असोसिएशनला संलग्न असलेल्या खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्यापासून रोखण्याचे आवाहन केले आहे.

अमिताभ चौधरी यांनी आपल्या सदस्य संघटनांना आणि आयोजकांना सावधानतेचा इशारा देताना म्हटले आहे की बीसीसीआयकडे १६ वर्षाखालील व १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेटपटूंच्या नावाची संपूर्ण सूची आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या, कूचबिहार ट्रॉफी, विनू मांकड ट्रॉफी, विजय मर्चंट ट्रॉफी यासारख्या स्पर्धांमध्ये खेळता येणार नाही.

मात्र या लीगचे आयोजक डॉ. दिनेश कपूर यांनी म्हटले आहे, आम्ही बीसीसीआयशी संलग्न असणाऱ्या कोणत्याही खेळाडूला घेतले नाही. बीसीसीआयच्या अधिकाराला आम्ही आव्हान देऊ इच्छित नाही. त्यांच्या अधिकाराचा आम्ही आदरच करतो. मात्र बीसीसीआय आम्हाला समाजातील उपेक्षित वर्गातील मुलांच्या गुणवत्तेला मदत करण्यापासून रोखू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘खेलो इंडिया’ या महत्त्वाकांक्षी योजनेला हातभार लावण्यासाठी गरीब व रस्त्यांवर खेळणाऱ्या क्रिकेटपटूंसाठी या लिगचे आयोजन करण्यात आले आहे.’
त्याशिवाय या लिगमध्ये गुजरात जायंट्स, कोलकाता स्ट्रायकर्स, बँगलोर स्टार्स, आसाम रेंजर्स, पुणे पॅन्थर्स, दिल्ली डॅशर्स, रांजी बूस्टर्स, पंजाब टायगर्स, डेहराडून रॉकर्स, यु.पी. हिरोज, हैदराबाद हॉक्स, चेन्नई चॅम्प्स, एम. पी. वॉिरअर्स व हरियाणा हरिकन्स हे अन्य संघ दुबईतील या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
 
स्पर्धेचे महत्त्व गाैतम गंभीरने पटवले
या साखळी क्रिकेट स्पर्धेचे महत्त्व भारताचा सलामीचा फलंदाज गौतम गंभीर यानेही स्पष्ट केले आहे. फिल्मस्टार अरबाज खान याने मुंबई मास्टर्स तर राजीव खंडेलवाल याने राजस्थान रोअर्स या संघाची जबाबदारी स्वीकारली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...