चेन्नई - सलामीवीर कॅमरून बेनक्राॅफ्टच्या १५० धावांच्या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलिया अ संघाने पहिल्या डावात ९ बाद ३२९ धावांचा डोंगर उभा केला. दुस-या चारदिवसीय कसोटीत भारत अ संघाला १३५ धावांत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलिया अ संघाकडे आता १९४ धावांची आघाडी झाली आहे.
सामन्याचा दुसरा दिवस ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर बेनक्रॉफ्ट व भारताचा बाबा अपराजित यांनी गाजवला. कालचा नाबाद फलंदाज बेनक्रॉफ्टने २६७ चेंडूंचा सामना करताना १६ चौकार आणि एका षटकाराच्या साह्याने १५० धावांचा पाऊस पाडला. दुसरा सलामीवीर कर्णधार उस्मान ख्वाजा ३३ धावा काढून बाद झाला. ऑस्ट्रेलिया अ संघाच्या सलामीवीरांनी १११ धावांची शतकी सलामी दिली. प्रज्ञान ओझाने ख्वाजाला बाद करून ही भागीदारी मोडली. बर्न्स ८ तर हँड्सकोम्ब शून्यावर बाद झाला. या दोघांना ओझाने तंबूत परतवले. बिनबाद १११ वरून अॉस्ट्रेलियाची स्थिती ३ बाद १२३ अशी झाली. फर्ग्युसन व बेनक्रॉफ्टने डाव सावरला. दोघांनी १०७ धावांची शतकी भागीदारी केली. फर्ग्युसन ५४ धावा काढून बाद झाला.
स्टोनिस, वेड अपयशी
ऑस्ट्रेलियाची टीम ४ बाद २३० अशा स्थितीत असताना मधल्या फळीत स्टोनिस व वेड हे अपयशी ठरले. स्टोनिसला केवळ १० तर वेडला ११ धावांचे योगदान देता आले. या दोघांच्या विकेट अपराजितने घेतल्या. पुढे येऊन मारण्याच्या नादात स्टोनिस यष्टिचीत झाला. तर वेड त्रिफळाचित होऊन परतला.
संधूची झुंज : तळाचा फलंदाज गुरविंदर संधूने चांगलीच झुंज दिली. त्याने नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना २७ चेंडूंत ३६ धावा ठोकल्या. या खेळीत त्याने ४ उत्तुंग षटकार खेचले. त्याचा अडथळाही अपराजितने दूर केला. संधूने ही आक्रमक खेळी १३३.३३ च्या स्ट्राइक रेटने केली.
बेनक्रॉफ्ट एकटाच ठरला वरचढ
एकेक गडी बाद होत असताना दुस-या टोकाने ऑस्ट्रेलिया अ संघाचा सलामीवीर बेनक्रॉफ्टने १५० धावा ठोकल्या. त्याने २६७ चेंडूंत १ षटकार, १६ चौकारांसह ५६.१७ च्या स्ट्राइक रेटने या धावा काढल्या. भारत अ संघाच्या १३५ धावांच्या तुलनेत बेनक्रॉफ्ट एकटाच वरचढ ठरला.